कर्जत : कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्ण आढळून आले. रविवारी महसूल, आरोग्य विभागाने मिरजगाव येथे जाऊन क्रांती चौकात व्यापारी व ग्रामस्थ यांच्या मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी केली. यामध्ये २४ जण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले.
तालुक्यात दोनशेहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना संदर्भात जनजागृती करून उपाययोजना करण्यासाठी महसूल व आरोग्य विभागाने मिरजगाव येथे अभियान राबविले. तहसीलदार नानासाहेब आगळेे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, वैद्यकीय अधिकारी हरिष दराडे यांनी मिरजगाव येथील बाजारपेठेत जाऊन व्यापारी, नागरिक, मुख्य रस्त्यावर असलेले फळांचे व्यापारी, भाजी विक्रेते यांना कोरोनाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले. यास मिरजगावकरांनी चांगला प्रतिसाद दिला.
येथील क्रांती चौकात तपासणी करण्यात आली. १२४ जणांनी तपासणी केली. यामध्ये २४ कोरोना बाधित आढळले. सध्या कर्जत येथील उपजिल्हा रूग्णालय, बारडगाव सुद्रिक, राशीन, कुळधरण, मिरजगाव, चापडगाव येथे नियमितपणे कोरोना चाचणी केली जात आहे. गरजू रूग्णांसाठी उपजिल्हा रूग्णालय व महात्मा गांधी विद्यालयाचे वसतिगृह येथे कोरोना रूग्णांच्या निवास व उपचारासाठी सोय करण्यात आली आहे. मिरजगाव येथे राबविण्यात आलेल्या अभियानात जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव तनपुरे, माजी उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, डॉ. पंढरीनाथ गोरे, सरपंच सुनीता खेतमाळस, उपसरपंच संगीता वीर, आरोग्य व महसूल विभागाचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.
--
२८ मिरजगाव
मिरजगाव येथील बाजारपेठ, मुख्य रस्त्यावर फळे विक्रेत्यांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करताना अधिकारी.