माजी महापौर कळमकर यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन दिले आहे. बेडची माहिती रुग्णांना मिळावी, यासाठी प्रशासनाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. मात्र, तेथे कोणतीही मदत केली जात नाही किंवा अद्ययावत माहिती उपलब्ध होत नाही. तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष केल्यास स्थानिक पातळीवर अपडेट तत्काळ मिळू शकते. ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत माहिती मिळत नसल्याने त्यांना उपचारासाठी थेट नगर शहरात आणले जात आहे. शहरात आधीच बेडची संख्या पुरेशी असल्याने काहींना वेळेत बेड न मिळाल्याने उपचाराआधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असताना त्या प्रमाणात प्रशासनाकडून बेड उपलब्ध होत नाहीत. अनेक रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन आवश्यक असतानाही वेळेत मिळत नाही.
नगर शहरात खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांबाबत अनेक तक्रारी येत आहेत. या बिलांची तपासणी करण्यासाठी व जादा बिले आकारणाऱ्यांवर कारवाईसाठी शासनाने यापूर्वीच निर्देश दिलेले आहेत. मागील वर्षी जिल्हास्तरावर समिती गठित करण्यात आली होती. यंदा जिल्हाधिकाऱ्यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असली, तरी महापालिकेकडून बिलांची तपासणी, जादा बिलांच्या रकमा परत करण्याबाबत अद्याप कोणतीही व्यवस्था केलेली नाही. कोरोना रुग्णांच्या एचआरसीटी टेस्टसाठी मोठी गर्दी झालेली आहे. त्यासाठी खासगी सेंटरमध्ये अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत. मनपाला दीड वर्षापूर्वी सीटीस्कॅन-एमआरआय मशीनसाठी निधी मिळाला होता. मात्र, प्रशासनाच्या हलर्गीपणामुळे ही मशीन अद्यापही कार्यरत झालेली नाही. महापालिकेला मिळालेल्या निधीतून एमआरआय-सीटीस्कॅन मशीनची उभारणी लवकरात लवकर करावी, अशी मागणीही कळमकर यांनी केली आहे.