अहमदनगर: राज्यभर गाजलेल्या यशस्विनी महिला ब्रिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून खटल्यात ख्यातनाम वकील ॲड. उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश नुकताच महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने जारी केला आहे.
या खटल्यात फिर्यादीच्यावतीने बाजू मांडण्यासाठी ॲड. यादव यांची नियुक्ती करावी, अशी मागणी मयत झरे यांच्या कुटुंबीयांनी शासनाकडे केली होती. जरे यांची नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात 30 नोव्हेंबर रोजी संगनमताने कट करून धारदार शस्त्राचा वार करून हत्या केली होती. यात तपासाअंती सकाळ या वृत्तपत्राचा तत्कालीन कार्यकारी संपादक बाळ बोठे याचे नाव पुढे आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक अजित पाटील यांनी सखोल तपास करून आतापर्यंत पाच आरोपीना जेरबंद करून भक्कम पुराव्याच्या आधारे सदर प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. तथापि, या प्रकरणातील सूत्रधार बाळ बोठे अजून पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने तो कधी सापडणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या नियुक्तीच्या अनुषंगाने मयत जरे कुटुंबीयांनी यादव यांच्या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.