कोपरगाव (जि. अहमदनगर) : संजीवनी साखर कारखान्यात ऊस देऊन शिंगणापूर शिवारात उभे केलेले ट्रॅक्टर व जुगाड अज्ञात चोरट्यांनी ११ महिन्यांपूर्वी पळविले होते. त्याचा शोध लावण्यात कोपरगाव शहर पोलिसांना यश आले आहे. कर्जत तालुक्यातून ट्रॅक्टर व जुगाड पोलिसांनी हस्तगत केले असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.
घटनेबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, ३० जानेवारी २०२३ रोजी ट्रॅक्टर चालक आनंदा संतोष माळी (वय ४९, रा. सायगाव बगळी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांनी कोपरगाव शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. ३० जानेवारी रोजी आनंदा माळी यांनी संजीवनी कारखान्यात ट्रॅक्टर व जुगाडमधून ऊस खाली केला. ट्रॅक्टर व जुगाड हे शिंगणापूर ते संवत्सर रस्त्यावर उभे केले. त्यानंतर जेवण करण्यास गेले. तासाभराने परत आल्यावर ट्रॅक्टर व जुगाड जागेवर नव्हते. ते अज्ञात चोरट्याने पळविले होते. याबाबत आनंदा माळी १ फेब्रुवारीला कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक तालुक्यातील जामदारवाडी येथे २४ डिसेंबर रोजी पोहोचले. तिथे आरोपी सीताराम ऊर्फ कैलास किसन भोजे (रा. जामदारवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यास अटक केली आणि चोरीस गेलेला ट्रॅक्टर व जुगाड असा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला.