अहमदनगर : अधिक मासाला शुक्रवार (दि. १८) पासून सुरूवात होत आहे. पितृपक्षाची गुरुवारी (दि. १७) सांगता झाल्याने गेल्या पंधरादिवसांपासून बाजारावर असलेली मरगळ हटणार आहे. तब्बल १९ वर्षांनी अश्विन महिन्यात अधिक मास आल्यामुळे घटस्थापना, नवरात्रौत्सव, दसरा-दिवाळी एक महिना लांबणीवर पडली आहे.
दर तीन वर्षांनी एकदा अधिक महिना येतो. दर १९ वर्षांनी पुन्हा तोच महिना अधिक मास येतो, असा कालगणनेचा सर्वसाधारण नियम आहे. यापूर्वी २००१ मध्ये अश्विन महिन्यात अधिक मास आला होता, अशी माहिती पंचांगांत नमूद करण्यात आली आहे. यंदाचा अधिक मास हा अश्विन महिना आहे. तीन वर्षांनी येणारा अधिक मास हा श्रावण महिना असणार आहे.
चैत्र, वैशाख, ज्येष्ठ असे १२ चांद्र मास आहेत. एका अमावस्येपासून दुसºया अमावस्येपर्यंत एक चांद्र मास असतो. मीन राशीत ज्या चांद्र मासाचा आरंभ होतो, त्यास चैत्र, मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र मासाचा आरंभ होतो, त्यास वैशाख मास म्हणतात. याप्रमाणे पुढील अनुक्रमाने पुढील चांद्र मास येतात. प्रत्येक चांद्र महिन्यात सूर्याचे राशीसंक्रमण झाले तर तो नेहमीचा चांद्र मास असतो. परंतु ज्या चांद्र मासात सूर्याचे राशीसंक्रमण होत नाही, त्या महिन्यास अधिक मास,मल मास, किंवा धोंडा मास म्हणतात, असे पंचांगकर्त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक महिन्याची एक देवता सांगितलेली आहे. अधिक मासाची देवता भगवान श्रीकृष्ण असल्याने अधिक मासास ‘पुरुषोत्तम मास’ असेही म्हटले जाते. ----घटस्थापना १७ आॅक्टोबरलापितृपक्षाची सांगता सर्वपित्री आमावस्येला होते. त्याच्या दुसºया दिवशी घटस्थापना होते. यंदा अधिक मास आल्याने घटस्थापना एक महिना लांबणीवर म्हणजे १७ आॅक्टोबरला होणार आहे, तर दसरा २५ आॅक्टोबरला आहे. गतवर्षी दिवाळी २७ आॅक्टोबरपासून सुरू झाली होती, यंदा १४ नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होणार आहे. ------अधिक मासात साखरपुडा, बारसे, डोहाळेजेवण, जावळ, गृहप्रवेश, नवीन वाहन खरेदी, नवीन व्यवसायाचा आरंभ करता येतो. विवाह, वास्तुशांती असे कार्यक्रम मात्र या महिन्यात करता येत नाहीत. जी कर्मे करणे आवश्यक आहे, ती सर्व या महिन्यात करावीत. अधिक महिना विष्णूचा महिना समजला जातो. जावयाला विष्णू स्वरूप मानले असल्याने जावयाला वाण देण्याची प्रथा आहे.-किशोर जोशी, अध्यक्ष, पुरोहित संघ----------