शेखर पानसरेसंगमनेर : २०१४ नंतर देशातील राजकारणाचा पोत बिघडला आहे. दुर्देवाने आता कुणी विरोधी बोलल्यानंतर त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ७ फेब्रुवारीला लोकसभेत राहुल गांधी यांनी जे भाषण केले. आणि असा प्रश्न विचारला की, अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध काय? हा प्रश्न आहे. याला उत्तर द्यायला पाहिजे होते. हे उत्तर देण्याऐवजी त्यांचा आवाज कसा बंद करता येईल. यावरच त्यांनी जोर दिला. अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
आमदार थोरात यांनी सोमवारी (दि. २७) संगमनेरात पत्रकारांशी संवाद साधला. आपली लोकशाही आहे, आपली राज्यघटना आहे. मतमतांतरे त्यामध्ये आहेच आहे. सत्ताधारी आहे तसा विरोधी पक्ष आहे. सत्ताधाऱ्यांचे काम जसे देश किंवा राज्य चालविणे असते. तसे विरोधकांनी सुद्धा कुठे चुकत असेल तर त्यावर बोट ठेवणे असते. त्याकरिता भाषणे आदी सर्व काही चाललेले असते. हे निकोप लोकशाहीचे स्वरूप असते त्यामध्ये हे चालते. मात्र, दुर्देवाने आता कुणी विरोधी बोलल्यानंतर त्याचा आवाजच बंद करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असे ते म्हणाले