जामखेड : तालुक्यातील वंजारवाडी येथील विंचरणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याचे अतिदाबामुळे दोन लोखंडी दरवाजे सोमवारी रात्री बाराच्या सुमारास पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. हे बंधारे तब्बल ३६ तासानंतर बसविण्यात यश आले असून, बंधा-यात अवघे आता २० टक्के पाणी उरले आहे.वंजारवाडी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा काठोकाठ भरून वाहत होता. या बंधा-याला २१ मो-या आहेत. एका मोरीत आठ लोखंडी दरवाजे आहेत. एका मोरीतील बंधा-यातील खालच्या बाजूतील दोन दरवाजे जिर्ण झालेले असल्याने पाण्याच्या अतिउच्च दाबामुळे ते वाहून गेले. यामुळे या बंधा-यातील लाखो लिटर पाणी वाया गेले. हे दरवाजे बसवण्यासाठी गावक-यांनी खूप प्रयत्न केले. पण अतिदाबामुळे शक्य झाले नाही. अखेर पाणी ३६ तासानंतर कमी झाल्याने गावक-यांनी दरवाजे बसवले. पण तोपर्यंत २० दशलक्ष घनफूट पाणी वाहून गेले होते.रत्नापूर येथील बंधा-यातील व पाटोदा येथील बंधा-यातील ओव्हरफ्लोचे पाणी विंचारणा नदीतून वंजारवाडी येथील बंधा-यात येत आहे. त्यामुळे बंधा-यात काही प्रमाणात पाणीसाठा वाढू शकतो. बंधा-यातील पाणी किती वाढते याकडे वंजारवाडी गावक-यांचे लक्ष लागले आहे.
कोल्हापूर बंधारा हा चारगावासाठी वरदान ठरणारा आहे. या बंधा-यातील पाणी मे महिन्यापर्यंत पुरले असते. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले असल्यामुळे गावक-यांना रडू आवरले नाही. ३६ तासानंतर ग्रामस्थांनी दरवाजे बसवले आहेत. वरील भागातील ओव्हरफ्लोचे पाणी पंधरा दिवस आणखी येत राहिल्यास बंधारा ७० ते ८० टक्के भरू शकतो.-आशा जायभाय, सरपंच, वंजारवाडी