अहमदनगर: अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवील अडकलेले पाणी अखेर गुरुवारी सायंकाळी कुकडीतून बाहेर पडले़ दुष्काळाने होरपळत असलेल्या दक्षिण नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला असून,भंडारदरा धरणातून दुपारी बारा वाजेच्या सुमारास आवर्तन सुरू करण्यात आले आहे़ त्यामुळे हजारो हेक्टरवरील खरीप पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे़कुकडी प्रकल्पातून गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ५०० क्युसेक वेगाने आवर्तन सोडण्यात आले़ आवर्तनाच्या आदेशाचा घोळ गुरुवारी दिवसभर सुरु होता़ सरकारी आदेश न आल्याने पाणी सुटले नाही़ निर्णय होऊन पाणी न सुटल्याने सर्वांचीच चिंता वाढली होती़ मात्र दुपारनंतर चके्र फिरले आणि सायंकाळी कुकडीतून पाणी नगरकडे झेपावले़ विशेष म्हणजे पिण्याबरोबरच हे पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे़ कुकडीच्या आवर्तनाचा लाभ कर्जत, जामखेड, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे़ दरम्यान भंडारदरा धरणातून १ हजार ७०० क्युसेक वेगाने आवर्तन सुरू करण्यात आले आहे़ सायंकाळी हे पाणी अकोला परिसरात दाखल झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ दक्षिण नगर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ टँकर भरण्यासाठीही पाणी शिल्लक नाही़ त्यामुळे कुकडी प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी आवर्तन सोडण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडून गेल्या २९ जुलै रोजी जलसंपदा विभागाकडे करण्यात आली होती़ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री शिंदे यांनी याबाबत जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन कुकडीतून आवर्तन सोडण्याचे आश्वासन दिले होते़ कुकडीत ४१ टक्के पाणीसाठा असल्याने पेच निर्माण झाला होता़ त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला नाही़ दुसऱ्या दिवशी पालकमंत्री राम शिंदे यांनी महाजन यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली़ त्यावर महाजन यांनी गुरुवारपासून आवर्तन सोडण्याचे आदेश दिले होते़ मात्र गुरुवारी दिवसभरात जलसंपदा विभागाकडून तसे आदेश प्रशासनास प्राप्त झाले नव्हते़ त्यामुळे दिवसभरात पाणी सुटले नाही़ सायंकाळी चक्रे फिरली आणि पाणी सुटले़ कुकडीतून ५०० क्युसेकने पाणी श्रीगोंद्याकडे झेपावले असून, हे पाणी नारायणवाडी,श्रीगोंदा तालुक्यात दाखल होणार असून, या पाण्यातून सोलापूर जिल्ह्याला पाणी दिले जाणार आहे़ पिण्याबरोबरच शेतीसाठी पाणी सुटल्याने खरिपाला दिलासा मिळाला आहे़ (प्रतिनिधी)
अखेर कुकडीतून पाणी सुटले
By admin | Published: August 13, 2015 11:13 PM