जामखेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश अंबादास राळेभात आणि राकेश अर्जुन राळेभात यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जामखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. वातावरण तणावग्रस्त असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मृत्यू पावलेल्या योगेश राळेभात व राकेश राळेभात यांचे मृतदेह पुण्याहून जामखेडच्या दिशेने निघाले आहेत.हत्या प्रकरणात असलेले आरोपी अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी मागणी केली आहे. जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. सर्व दुकाने, व्यापारी बाजारपेठ बंद असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांनी जामखेडला घडल्या प्रकारची माहिती घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. राजकीय फलक लावण्याच्या वादातून हत्या झाल्याची तक्रार योगेश राळेभातचा भाऊ कृष्णा राळेभात यांनी दिली आहे. याप्रकरणी गोविंद दत्ता गायकवाड याच्यासह इतर ४ ते ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. शहरातील बीड रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील योगेश आणि राकेश राळेभात हे मित्रांसोबत बसले होते. संध्याकाळच्या सुमारास तीन अज्ञात हल्लेखोरांनी योगेश राळेभातवर गोळ्या झाडल्या. राकेश राळेभात हा मदतीसाठी धावला असता त्याच्यावरही एक गोळी झाडली. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. पोलीस यंत्रणा आरोपींचा शोध घेत आहेत.
दुहेरी हत्याकांडानंतर जामखेडमध्ये कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:12 PM