अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले. राधाकृष्ण विखे लोणी येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
विखे म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून मोकळेपणाने बोलता येत नव्हते. गेली साडेचार वर्षे मी विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. नेत्यांनी आमच्या पाठीमागे उभे राहण्याऐवजी आम्हाला राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा सल्ला दिला. सुजय विखे यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढावी असा आग्रह होता. हे असे सांगून एक प्रकारे राजकीय आत्महत्या आम्हाला करायला लावण्याची भुमिका पक्षातूनच घेण्यात आली. पक्षासाठी योगदान असूनही पक्ष आमच्या पाठीशी उभा राहिला नाही, अशी खंत राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.
गेल्या चार वर्षांच्या काळात कार्यकर्त्यांचा, सहकारी आमदारांचे मनोबल वाढविण्याचे काम मी केले. या काळात चांगले काम केल्याचे समाधान मला आहे. अनेक नेत्यांच्या जिल्ह्यात काँग्रेसची सत्ता आली नाही. मात्र आमच्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेवर काँग्रेसने सत्ता मिळविली. लोकसभा निवडणुकांच्या सुरुवातीला जागावाटपाची चर्चा सुरु होती. आमची सुरुवातीपासूनच काँग्रेसला जागा सोडावी, अशी मागणी होती. यासाठी शरद पवारांनाही भेटलो. आमच्या पक्षातील काही मंडळी ही जागा न सोडण्यासाठी प्रयत्न करत होते. या सर्व घटनेमध्ये डॉ.सुजय विखे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह होता. यासाठी राहुल गांधी यांनाही भेटलो. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सुजयने भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. १५ मार्च रोजी राजीनामा दिला. तो स्विकारला गेला. याबाबत मला दु:ख नाही. निवडणूकीत पवार विरूध्द विखे असा रंग आला. आमच्या भाऊबंदकीवर पवारांनी निवडणूक आणली. पवारांनी आमच्या वडीलांवर जिव्हारी टीका केली, असेही विखे म्हणाले.