राहुरी : लॉकडाऊनमुळे व्यसनमुक्तीला चांगले गिफ्ट मिळाले आहे. महाराष्ट्रात दारू विक्रीने निचांक गाठला असून घसरलेल्या आलेखामुळे गुन्हेगारीचा आलेख घसरला आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून मध्य मुक्त महाराष्ट्र उभय करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी सांगितले.
विलास म्हणाल्या, शहरी भागात ८५ टक्के तर ग्रामीण भागात ८० टक्के दारू पिण्याचे प्रमाण कमी झाले आहे. महाराष्ट्र राज्य दारू उत्पादन शुल्क विभागाने एका दिवसात १५२ केसेस दाखल केल्या आहेत. ५५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३८ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. ग्रामीण भागात हातभट्टी दारू विक्री सुरू आहे. कोरोनामुळे दारूची उपलब्धता कमी झाली आहे. दारू बंद झाल्यामुळे कुटुंबातील महिलांवर होणारे अत्याचार कमी झाले आहेत. हॉटेल बंद असल्यामुळे अनेक जणांना व्यसनमुक्तीची गिफ्ट दिले आहे.
दारूपासून महाराष्ट्र शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. शासनाने दारूकडे महसूल म्हणून न बघता आरोग्याच्या दृष्टीने बघावे. दारू बरोबर तंबाखू, सिगारेट, गुटखा अशा व्यसनांचे प्रमाणही घसरले आहे. महाराष्ट्रातील तीन जिल्ह्याप्रमाणे राज्यात टप्याटप्याने दारूबंदी व्हावी असा पाठपुरावा व्यसनमुक्तीचे कार्यकर्ते राज्य शासनाकडे करणार आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेली व्यसन मुक्तीचे कार्यकर्ते आव्हान म्हणून व्यसनमुक्ती चळवळीला सामोरे जाणार आहेत.
बिहारमध्ये दारूबंदी झाल्यानंतर हा खर्च मुलांच्या दुधावर केला जाऊ लागला. महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने दारूबंदी व्हावी म्हणून राज्यातील व्यसनमुक्तीचे शिष्टमंडळ शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे. शासनाने व्यसन मुक्तीसाठी कायदे करण्याची गरज आहे. - वर्षा विद्या विलास, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ