अहमदनगर : केडगाव येथे शिवसैनिकांचे हत्याकांड झाल्यानंतर भानुदास कोतकर हा मुख्य मारेकरी संदीप गुंजाळ व सुवर्णा कोतकर यांच्या संपर्कात होता. तसेच कोतकर याची प्रकृती ठणठणीत असल्याने त्याचा जामीन अर्ज मंजूर करू नये, असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. केदार केसकर यांनी केला.केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या भानुदास कोतकर याच्यावतीने जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावर सोमवारी आरोपी पक्षाच्यावतीने युक्तिवाद केला. कोतकरला राजकीय षडयंत्रातून गुन्ह्यात अडकविले आहे. तसेच तो दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याने त्याला जामीन मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली होती. यावर सरकारी पक्षाने कोतकरची वैद्यकीय जामिनावर सुटका झाल्यानंतर केडगाव हत्याकांड घडलेले आहे. केडगाव हे शहरापासून दूर आहे. त्यामुळे कोतकरला राजकीय द्वेषातून अडकवले असल्याच्या आरोपी पक्षाच्या म्हणण्यात तथ्य नाही, तसेच कोतकर यांची प्रकृती ठणठणीत आहे. तसा जबाब स्वत: कोतकर यानेच सीआयडी अधिकाऱ्यांना दिला असल्याचेही केसकर यांनी स्पष्ट केले. या अर्जावर आता न्यायालय बुधवारी निर्णय देणार आहे. दरम्यान सरकारी वकील यांनी कोतकर याच्याविरुध्द दाखल असलेल्या ३२ गुन्ह्यांची यादी न्यायालयासमोर सादर केली. हे सर्व गुन्हे जीविताशी निगडीत असल्याचे केसकर यांनी सांगितले. आरोपी पक्षाच्या वकिलांनी आक्षेप घेत कोतकर याच्याविरुध्द कमी गुन्हे असल्याचे सांगितले. मात्र, तसे असल्यास न्यायालयाच्या सर्टीफाईड कॉपी सादर करणे आवश्यक असल्याचे सरकारी वकील केसकर यांनी सांगितले.
हत्याकांडानंतर कोतकर गुंजाळच्या संपर्कात : सरकारी पक्षाचा युक्तिवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 11:44 IST