बेलापूर : बेलापूर परिसरातील गोखलेवाडी शिवारात कुत्र्याच्या मागावर असलेला बिबट्या विहिरीत पडला. मोठ्या प्रयत्नानंतर त्यास बाहेर काढण्यात ग्रामस्थ व वन विभागाच्या कर्मचा-यांना यश आले. बुधवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बबन बाबूराव दाणी यांच्या वस्तीवर असणा-या कुत्र्याला पकडण्याच्या प्रयत्नात बिबट्या विहिरीत पडला. ही घटना बबन दाणी यांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला. वन विभागाच्या कर्मचाºयांनी उक्कलगाव येथून पिंजरा आणला. बबन दाणी, बाळासाहेब भुजाडी, प्रकाश मेहेत्रे, वाल्मीक भुजाडी, विजय बर्डे, राजेंद्र बर्डे, दत्तू सरोदे, संजय भुजाडी, सोहम लगे, गणेश मेहेत्रे, गोरख काळे, अशोक शेळके, भास्कर वाघ यांनी याकामी मदत केली. जेसीबीच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडला. कसाबसा बिबट्या पिंज-यात अडकला. सायंकाळी साडेआठ वाजता विहिरीत पडलेला बिबट्याला पहाटे साडे तीन वाजता विहिरीबाहेर काढण्यात वन विभागाला यश आले. या कामी गोखलेवाडीतील तरुणांची मोठी मदत मिळाली. वनरक्षक ए. आर. पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा नर बिबट्या असून तो साडेचार वर्षाचा असल्याची माहिती दिली. वन विभागाचे एस. एम. लांडे, गोरक्ष सुरसे मोहिमेत सहभागी झाले होते.
सात तासानंतर विहिरीतून बिबट्या बाहेर; गोखलेवाडीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 5:59 PM