अहमदनगर : शहरात रात्रीच्या वेळी होणारी गर्दी रोखण्यासाठी महापालिकेची भरारी पथके शहरात फिरत आहेत. मात्र, हे पथक पुढे गेल्याचे पाहून नागरिक पुन्हा गर्दी करत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गर्दी रोखण्यासाठी महापालिकेने चार पथके स्थापन केले आहेत. ही पथके शहरात फिरून गर्दीच्या ठिकाणांना भेटी देऊन कारवाई करत आहेत. असे असले तरी कृषी उत्पन्न बाजार समिती, चितळे रोड, बालिकाश्रम रोड, गाडगीळ पटांगण, यशोदानगर आदी ठिकाणी भाजी घेण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसतात. तसेच रात्रीच्या वेळी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले जात आहेत. या स्टॉलवरही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. गर्दीत जाऊन पथके कारवाई करतात. कारवाई करून पथक पुढच्या प्रवासाला निघते. पथक गेल्याची खात्री झाल्यानंतर पुन्हा दुकाने, चहाच्या टपऱ्या आदी ठिकाणी गर्दी होते. व्यावसायिकांचाही नाइलाज हाेतो. त्यांना व्यावसाय करायचा असल्याने तेही ग्राहकांना दुखावत नाहीत. त्यामुळे पुन्हा गर्दी होत असून, ही गर्दी रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
लॉकडाऊनच्या भीतीने ग्राहक जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी नगर शहरात येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. महापालिकेचे पथक सकाळी व सायंकाळी, आशा दोन वेळा शहरात फिरत आहेत. मास्क न वापरणारे गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. काही वेळा आम्हीच दिसतो, इतर लोक तुम्हाला दिसत नाहीत का, अशा तक्रारी व्यावसायिक पथकाकडे करत असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी पथकाने कारवाईची मोहीम उघडली आहे; परंतु नागरिक पथकालाही जुमानत नाहीत. पथक पुढे गेल्यानंतर मागे पुन्हा गर्दी करत असून, यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे.
......
दीड लाखाचा दंड वसूल
महापालिकेच्या चारही पथकांनी आठवडाभरात २८० जणांवर दंडात्मक कारवाई केली असून, त्यांच्याकडून १ लाख ५० हजारांचा दंड वसूल केला आहे. मास्क न वापरणे व दुकानांमध्ये गर्दी करणे, या कारणांसाठी ही कारवाई करण्यात आली असून, कारवाईची मोहीम आणखी कडक करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
.....
ही आहेत गर्दीची ठिकाणे
कृषी उत्पन्न बाजार समिती, गाडगीळ पटांगण, चितळे राडे, बालिकाश्रम रोड, यशोदानगर भाजी मार्केट, कापडबाजार, दिल्लीगेट, आनंदधाम, पाइपलाइन रोड, गुलमोहर रोड आदी ठिकाणी सर्वाधिक गर्दी होत असल्याचे महापालिकेच्या पथकाकडून सांगण्यात आले.