अहमदनगर: अलीकडेच लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांचा भीक मागत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्येष्ठ तमाशा कलावंत, लावणी सम्राज्ञी शांताबाई लोंढे कोपरगावकर यांची व्यथा पाहून अनेकांना धक्का बसला. सरकारने त्यांची व्यथा जाणून आर्थिक मदत करावी अशी भावना चाहत्यांमध्ये आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. खरं तर शांताबाई यांची शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमात तात्पुरत्या निवासाची व्यवस्था झाली आहे. लक्षणीय बाब म्हणजे लावणी सम्राज्ञी यांना लवकरच त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे.
दरम्यान, शांताबाई कोपरगावकर ज्या वृद्धाश्रमात आहेत तिथे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी त्यांची भेट घेतली. तसेच संजय गांधी निराधार योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना तात्काळ मिळवून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहेत. याशिवाय शांताबाई यांच्यासाठी कोपरगावमध्ये घरकुल योजनेतून घर देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोण आहेत शांताबाई कोपरगावकर?शांताबाई कोपरगावकर एकेकाळी लावणी सम्राज्ञी म्हणून सर्वदूर प्रसिद्ध होत्या. शांताबाई यांचे सध्याचे वय ७५ वर्षे आहे. एकेकाळी शांताबाईंनी आपल्या लावणी नृत्याने लालबाग परळमधील हनुमान थिएटर गाजवले होते. त्यावेळी कोपगाव बसस्थानकावर काम करणाऱ्या कर्मचारी अत्तार भाईंशी त्यांची ओळख झाली होती. अत्तार भाईंनी शांताबाईंच्या नावाने तमाशा फड काढला. शांताबाईंना त्यांनी या फडाची मालकीण बनवले होते. महाराष्ट्रात जत्रा यात्रामध्ये शांताबाईंनी अनेक कार्यक्रम सादर केले. बक्कळ पैसा कमावला. पुढे अत्तार भाईंनी त्यांचा तमशा फड विकायला काढला. यात शांताबाईंची मोठी फसवणूक करण्यात आली. या घटनेनंतर शांताबाईंचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्या बसस्थानकावर भीक मागू लागल्या. पन्नास साठ लोकांचे पोट भरणाऱ्या शांताबाईंची बिकट अवस्था झाली आणि त्या रस्त्यावर आल्या.