राहुरी : तीस वर्षापूर्वी पाथरे खुर्द (ता.राहुरी) येथील प्राथमिक शाळेतील शिक्षकास मारहाण करणाऱ्या आरोपीची राहुरी येथील न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.या खटल्याची माहिती अशी की, मौजे पाथरे खुर्द गावात मराठी मुलांच्या शाळेत १७ जून १९८८ रोजी आरोपी बाळू गोपीनाथ जाधव याने तत्कालीन शिक्षकाने आरोपीच्या मुलाचा जन्माचा दाखला मागितला म्हणून आरोपीने शिक्षकास शिवीगाळ करून मारहाण केली होती. शिक्षकास सरकारी काम करण्यास प्रतिबंध केला अगर कागदपत्राचे नुकसान केले म्हणून तत्कालीन शिक्षक पाराजी तुकाराम कांबळे यांनी जाधव याच्याविरुध्द राहुरी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास केला, परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी राहुरी तालुक्यातून फरार झाला. त्यामुळे पोलिसांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड २९९ प्रमाणे दोषारोप पत्र दाखल केले होते. आरोपी फरार असल्यामुळे राहुरी येथील न्यायालयाने आरोपीविरुद्ध कायमस्वरूपी वॉरंटचा हुकूम केला.सदर खटला दाखल झाल्यानंतर तब्बल तीस वर्षांनंतर राहुरी पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणा लागला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीस राहुरी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर राहुरी येथील न्यायाधीश श्रीमती भाग्यश्री एम. कोठावळे यांनी त्यास सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. आरोपीतर्फे अॅड. प्रकाश संसारे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. सविता गांधले-ठाणगे यांनी सहकार्य केले.
तब्बल तीस वर्षांनंतर आरोपी निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 1:57 PM