अहमदनगर - कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज सपत्नीक पंढरपूरच्या पांडुरंगाची पूजा झाली. विशेष म्हणजे आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या पुजेचा मान मिळालेले देवेंद्र फडणवीस हे एकमेव मंत्री ठरले आहेत. त्यामुळे, आजच्या विठ्ठल महापुजेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच, आता राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे. पुढील वर्षी विठ्ठलाची शासकीय महापूजा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याहस्ते होईल, असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे. शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीरासाठी ते आले होते, त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबीर दोन दिवस शिर्डी येथे होत आहे. त्यासाठी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राज्यातील राष्ट्रवादीचे बडे नेते, आमदार आणि पदाधिकारी येथे उपस्थित आहेत. अजित पवार यांनी सकाळीच श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत उपस्थित होत्या. महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते मा.ना.अजित पवार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सत्कार केला.
राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीरासाठी आलेल्या अमोल मिटकरी यांनी विठ्ठलाच्या महापुजेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्रीपदाचा दावा केला आहे. विठ्ठलाची पुढची शासकीय महापुजा ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री करतील. इतकंच नाही तर या सरकारमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. अजित पवार हे पुढचे मुख्यमंत्री असतील आणि तेच शासकीय पुजा करतील, असा विश्वास मिटकरी यांनी व्यक्त केला. राज्यातील जनतेच्या मनात रोष आहे. आषाढी आणि कार्तिकीची पूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत असतात. त्यामुळे पुढील शासकीय महापूजा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीच करतील, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच, अजित पवारांसारखे नेतृत्व महाराष्ट्राला लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना असल्याचंही ते म्हणाले.