अहमदनगर : येथील मेकॅनाईज्ड इन्फ्रंट्री रेजिमेंट सेंटर (एमआयआरसी) या लष्करी प्रशिक्षण केंद्रात शनिवारी झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये १८५ जवानांनी देशसेवेची शपथ घेत सैन्यात प्रवेश केला. प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारी एमआयआरसीमधील ही सैन्याची ४२६वी तुकडी आहे. ३६ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून हे जवान देशसेवेसाठी सज्ज झाले आहेत. शनिवारी सकाळी शपथग्रहण सोहळ्याच्या वेळी शानदार संचलन करीत जवानांनी उपस्थितांची मने जिंकली. लष्कराच्या बँडपथकाने सादर केलेल्या धूनवर जवानांचे मैदानावर आगमन झाले. जवानांनी पहिली सलामी कर्नल विनायक शर्मा यांना, दुसरी सलामी कर्नल रसेल डिसुजा यांना तर तिसरी सलामी एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर वी. एस. राणा यांना दिली. प्रमुख पाहुणे लेप्टनंट जनरल इकरूप सिंह घुमन यांनी संचलनाची मुख्य सलामी स्वीकारली व संचलनाची पाहणी केली. त्यानंतर जवानांनी आपापल्या धर्मगुरूंकडून धर्मग्रंथावर हात ठेवत देशरक्षणाची शपथ घेतली.प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणारा मारूत मिश्रा बेस्ट रिक्रुट ठरला. त्याचा जनरल सुंदरजी सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. तर रिक्रुट पिंड्राला राजू व रोहित कुमार यांना अनुक्रमे जनरल के. एल. डिसूजा रौप्यपदक व जनरल पंकज जोशी कांस्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले. रिक्रुट दिलप्रीत सिंह याला बेस्ट ड्रिल कॅडेटने गौरविण्यात आले. लेप्टनंट जनरल इकरूप सिंह घुमन यांनी जवानांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. एक सामान्य नागरिकाचे सैन्यात रूपांतर करणारे या जवानांचे प्रशिक्षक, तसेच ज्यांनी देशसेवेसाठी आपली मुले सैन्यात दाखल केली अशा उपस्थित जवानांच्या पालकांचे घुमन यांनी कौतूक केले. जवानांच्या पालकांचाही विशेष गौरव करण्यात आला. शहीद हवालदार बने सिंह गुज्जर व शहीद जय सिंह बोरा या दोघांच्या पत्नींचा ‘वीरनारी’ म्हणून खास सन्मान करण्यात आला.
एमआयआरसीतील प्रशिक्षणानंतर १८५ जवान सैन्यात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 1:15 PM