कोपरगाव (जि. अहमदनगर) : तालुक्यातील कोळगावथडी येथे एका धार्मिक स्थळात घुसून धर्मग्रंथ फाडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली होती. या घटनेनंतर सकाळी कोळगावथडी येथे व त्यानंतर दुपारी कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आरोपीस अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.
कोळगावथडी येथील एका धार्मिक स्थळात गुरुवारी रात्री बारा ते शुक्रवारी सकाळी सहाच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने घुसून आतील धर्मग्रंथांची फाडाफाड केली. ही बाब सकाळी लक्षात आल्यानंतर कोळगावथडी येथे जमाव जमला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आदींनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांततेचे आवाहन केले.
दरम्यान दुपारी तीन नंतर कोळगावथडी येथील घटनेचे पडसाद कोपरगाव शहरात उमटले. असंख्य नागरिक कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात जमले. तिथे आरोपीच्या अटकेची मागणी केली. तशा आशयाचे निवेदन पोलीस निरीक्षकांना दिले. यावेळी पोलीस प्रशासनाने आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यास अटक करू असे आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळले. दरम्यान अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.