अहमदनगर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण असलेल्या ‘अक्षय तृतीया’ या सणाला नवीन वास्तू, वाहन, जमीन खरेदी आणि खास करून या दिवशी सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदा कोरोनाच्या सावटामुळे आधी गुढीपाडवा कोरडा गेला व आता अक्षय तृतीयेचाही मुहूर्त हुकला आहे. सराफा व्यापार पूर्णपणे ठप्प झाला आहे. अक्षय तृतीयेचा आणि लग्नसराईचा संबंध केवळ खरेदीपुरता आहे. लग्नसराईसाठी अनेक जण अक्षय तृतीयेचा मुहूर्त खरेदीसाठी निवडतात. या दिवशी शक्यतो सोने, सोन्याचे दागिने खरेदी करण्यावर भर दिला जातो. ज्यांच्याकडे लग्नकार्ये असतात, तेही सोन्याची खरेदी अक्षय तृतीयेला करतात. गतवर्षीही अक्षय तृतीया लॉकडाऊनमध्येच होती. यंदाही सलग दुसऱ्या वर्षी अक्षय तृतीयेला नगर जिल्ह्यातील दुकाने बंद आहेत, तसेच लग्नकार्यांनाही बंदी आहे. त्यामुळे लग्नकार्ये करायची कशी? असा प्रश्न आहे.
-------
नियमांचा अडसर
मे महिन्यात लग्नाचा मुहूर्त असला तरी लग्नसोहळे करणे शक्य होणार नाही. घरामध्येही लग्नकार्ये केली तरी जास्त लोकांची गर्दी आढळून आल्यास पोलिसांकडून ५० हजारापर्यंत दंड ठोठावला जातो. त्यामुळे लग्नकार्ये करण्यासही कोणी धजावत नाही. लग्नच नाहीत, तर मग खरेदी तरी कशाला करायची, अशी वधू-वर पित्यांची भूमिका आहे. राज्य शासनाने २५ लोकांमध्ये लग्न करण्यास परवानगी दिली होती; मात्र नगर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन ही सवलतही जिल्ह्यात रद्द करण्यात आली होती. त्यामुळे लग्नासाठी परवानगी मागितली तरी दिली जात नाही. या नियमांमुळे कोणीच लग्न करण्यास धजावत नाही.
-------------
मंगल कार्यालयांचे गणित बिघडले
नगर शहरात छोटी-मोठी ८० मंगल कार्यालये आहेत. मार्च महिन्यात ६-७ लग्न कार्यासाठी तारखा आरक्षित झाल्या होत्या; मात्र १४ एप्रिलनंतर झालेले कडक निर्बंध आणि कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे त्या तारखाही रद्द झाल्या. आता मे महिन्यातही लग्नकार्य नसल्याने मंगल कार्यालये आणि त्यावर अवलंबून असणारे अनेक व्यावसायिक, कामगार यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. आता कधी कोरोना संपणार आणि कधी मंगल कार्यालये सुरू होणार, हे सध्या तरी सांगता येत नाही, असे मंगल कार्यालयांचे मालक भगवान फुलसौंदर, धनंजय जाधव यांनी सांगितले. लग्न कार्य बंद असल्याने आमच्या व्यवसायाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गत मार्चपासून बिघडलेले अर्थचक्र रुळावर कधी येणार, याचीच चिंता असल्याचेही ते म्हणाले.
------------
यंदाही कर्तव्य नाही.
-----------
माझ्या मुलीचे लग्न जमले आहे. मे मध्ये तारीखही निश्चित केली होती. बंगल्यात लग्न करायचे म्हटले तरी किमान २० जणांना तरी बोलवावे लागते. त्यालाही परवानगी नाही. आपल्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो, याची जाणीव असल्याने विवाह सोहळाच रद्द केला आहे.
-वधुपिता, अहमदनगर.
---------------
माझ्या मुलाचे लग्न २० मे रोजी आहे. आता पुन्हा लॉकडाऊनमध्ये वाढ झाली आहे. नगरला लग्न करण्याचे ठरले होते; पण आता ते शक्य होणार नाही. दहा लोकांमध्ये घरात लग्न केले तरी जवळचे नातेवाईकसुद्धा बोलवणे शक्य नाही. त्यामुळे आम्हीही सध्या सहा महिने लग्न लांबणीवरच टाकले आहे.
-वरपिता, अहमदनगर.
--------------
मे महिन्यातील लग्न मुहूर्त
१, २, ५, ८, १३, १५, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१ (एकूण १३ मुहूर्त)
-----------
नेट फोटो डमी
वेडिंग
मंगल कार्यालय
वेडिंग (१)
१२ अक्षय तृतीया मॉरेज ॲण्ड लॉकडाऊन