लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर : ७९ वर्षांचा तरुण नेता, अशी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची नव्याने ख्याती झाली आहे. मधुमेह अथवा रक्तदाबाचा त्रास नाही. सर्व दात ठणठणीत व पोटही सुटलेले नाही. एकही दिवस दांडी न मारता नित्य व्यायाम करणारा हा नेता आता व्हॉलीबॉलचे मैदान गाजवीत आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात एक संघ स्थापन करून मैदान उभारण्याचा चंग मुरकुटे यांनी बांधला आहे.
वडाळा महादेव, कारेगाव, फत्याबाद, माळेवाडी, खैरी निमगाव, खोकर, नरसाळी, तसेच नेवाशातील गोगलगाव येथे मुरकुटे यांनी मैदानांचे उद्घाटन केले. माजी जि.प. अध्यक्ष बाबासाहेब भिटे व जि.प. सदस्य धनराज गाडे यांच्या वांबोरी व बारागाव नांदूर येथेही पुढील आठवड्यात व्हॉलीबॉल मैदान खुले होणार आहे.
विशेष म्हणजे मुरकुटे हे स्वतः एका संघाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या संघात चौदा वर्षांच्या दोन मुलांसह ते ८० व्या वर्षी संघाचा भाग बनले आहेत. मैदानाच्या उद्घाटनप्रसंगी मुरकुटे हे स्वतः संघासह तेथे दाखल होतात. एक सामना खेळून त्यात आपली चुणूक दाखवतात. उपस्थितही त्यांचा खेळ पाहून अवाक् होत आहेत.
७९ वर्षांचा हा खेळाडू मैदान गाजवीत असेल तर आपल्याला बाहेर बसता येणार नाही. त्यामुळे गावातील तरुण व ज्येष्ठ सर्वच व्हॉलीबॉलकडे आकर्षित होत आहेत.
हल्लीची तरुण पिढी मोबाइलमध्ये गुरफटून गेली आहे. त्यांना व्यायामाची सवय नाही. शारीरिक कष्ट करीत नाहीत. त्यामुळे ऐन तारुण्यात त्यांना व्याधींनी घेरले आहे. ते चित्र बदलून टाकण्यासाठी हॉलीबॉलच्या माध्यमातून तरुणाईला खेळ आणि व्यायामाकडे खेचण्याचा आपला प्रयत्न आहे, असे मुरकुटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
या खेळासाठी वयाची कोणतीही अट नाही. मोठे मैदानही लागत नाही व हा खेळ जास्त खर्चिक नाही. व्यायाम मात्र अफाट होतो. साधारणपणे बारा खेळाडू यात सहभागी होतात. सकाळी दोन व सायंकाळी चार सत्रांत सामने खेळता येतात. त्यामुळे एका मैदानावर शंभर जण सहज खेळू शकतील, असे ते म्हणाले.
--------
ग्रामपंचायती व सेवा संस्थांकडे जागा आहेत. तेथे नेट लावून व्हॉलीबॉलचे मैदान तयार होऊ शकते. खेळाची संस्कृती त्यातून जोपासली जाईल. व्यायामाबरोबरच खेळाचा मनमुराद आनंद लुटता येईल.
-भानुदास मुरकुटे, माजी आमदार, श्रीरामपूर.
-----------
असा आहे नित्यक्रम
मुरकुटे यांनी निवासस्थानी जीम उभारली आहे. व्यायामानंतर भल्या सकाळी ते बोरावके महाविद्यालयाच्या मैदानावर सायकलवर जातात. मैदानावर धावल्यानंतर सहकाऱ्यांसमवेत गप्पांच्या फडात ते रंगतात.
----------
फोटो -२१मुरकुटे व्हॉलीबॉल
ओळी : श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे मैदानाचे उद्घाटन करताना माजी आमदार भानुदास मुरकुटे.
--------