पाथर्डी : पिंगेवाडी (ता. शेवगाव) येथील नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा केल्याप्रकरणी तहसीलदार, शेवगाव यांच्यावर कारवाई करावी, यासाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते विशाल बलदवा यांनी मंगळवारी उपोषण करत चौकशीची मागणी केली.
पिंगेवाडी येथील नदीपात्रातून १ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता कायदेशीर प्रक्रिया न राबवता बेकायदा पद्धतीने तहसीलदार अर्चना पागिरे यांनी स्थानिकांशी संगनमत करून जेसीबीच्या साहाय्याने प्रत्यक्षात ७० ब्रास वाळूसाठा असताना केवळ २० ब्रास वाळू कागदोपत्री दाखविला. त्यांनी कायदेशीर लिलाव प्रक्रियेला फाटा देत थेट लिलाव करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे, असे बलदवा यांनी म्हटले आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर दोन दिवसांनी सुटीच्या दिवशी लिलाव करण्याबाबत विचारणा करण्यात आली. प्रत्यक्षात लिलाव झाला नसल्याबाबत तक्रार करण्यात आली. महसूल बुडवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते नजीर शेख हुसेन यांनी जिल्हाधिकारी, महसूल आयुक्त नाशिक यांच्याकडे तक्रार दिली. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी पी.एन. चोरमारे यांनी सदर प्रकरणी प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी सदरीलप्रकरणी सात दिवसांत चौकशी अहवाल पाठवण्याबाबत कळवले; परंतु १५ दिवस उलटूनही प्रांताधिकारी यांनी काहीच कार्यवाही न केल्याने सामाजिक कार्यकर्ते विशाल बलदवा यांनी मंगळवारी सकाळी प्रांताधिकारी कार्यालयात उपोषण आंदोलनास सुरुवात केली. सायंकाळपर्यंत गौण खनिज विभाग जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल कळवणार असल्याचे लेखी आश्वासन प्रांताधिकारी यांनी बलदवा यांना दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
.....
पिंगेवाडी येथील वादग्रस्त वाळू लिलावप्रकरणी महसुली कर्मचारी व अधिकारी यांचे जबाब नोंदवल्यानंतर वरिष्ठांना अहवाल कळवणार आहे.
- देवदत्त केकाण,
प्रांताधिकारी, पाथर्डी.
फोटो २२ पाथर्डी आंदोलन
पाथर्डी प्रांताधिकारी कार्यालयासमोर
सामाजिक कार्यकर्ते विशाल बलदवा यांनी मंगळवारी उपोषण केले.