शिर्डी : शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांची बदली रद्द करावी. त्यांना किमान वर्षभर मुदतवाढ द्यावी, या मागणीसाठी बुधवारी (१२ आॅगस्ट) दुपारी शिर्डीत नागरिकांनी धरणे आंदोलन केले. बदली रद्द न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिला.
गेल्या तीन वर्षात सतीश दिघे यांनी लोकप्रतिनिधी व नगरपंचायत पदाधिका-यांच्या सहर्कायातून शिर्डीचा चेहरामोहरा बदलून टाकला. नगरपंचायत साठवण तलावात अल्पावधीत प्लास्टिक कागद टाकून दिघे यांनी शिर्डीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला. अस्वच्छ शहर अशी ओळख असलेल्या साईनगरीने अलीकडे देशात स्वच्छतेचा ठसा उमटवला़ आहे. लॉकडाऊननंतरची शिर्डी सुरळीत करण्यासाठी दिघे यांची गरज असल्याची मागणी यावेळी करण्यात आली.
बुधवारी दुपारनंतर प्रमुख पदाधिका-यांनी नगरपंचायतीसमोर धरणे आंदोलन केले़. यामध्ये साईनिर्माणचे विजय कोते, नितीन कोते, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचीन तांबे, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, बाबासाहेब गोंदकर, रवींद्र गोंदकर, हरिश्चंद्र कोते, दीपक वारूळे, पोपट शिंदे, ताराचंद कोते, विकास गोंदकर, मुकूंद गोंदकर, गणेश कोते उपस्थीत होते़.