अहमदनगर: आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी परिचारकांच्या आंदोलनाला अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात सुरुवात झाली. परिचारिकांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला. तसेच कोणतीही सेवा विस्कळीत होऊ देता जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली.
आरोग्य सेवा परिचारिका संघटनेतर्फे येथील जिल्हा रुग्णालयात आंदोलनाची सुरुवात झाली. जिल्हा रुग्णालयातील रुग्ण सेवा विस्कळीत न करता आपले कर्तव्य रुग्णसेवा सांभाळून, काळी फीत लावून रुग्णालयाच्या आवारात आंदोलनाची शांततेत सुरुवात झाली. 1 ते 7 सप्टेंबर पर्यंत काळी फीत लावून आंदोलन चालू राहणार आहे.
केंद्राप्रमाणे जोखीम भत्ता देणे, रिक्त पदे तातडीने भरणे, बांधपत्रीत व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणे तसेच ड्युटी केल्यानंतर सात दिवस क्वारंटाईन करणे मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू झाले आहे.
आंदोलनाची सुरुवात करण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटना पदाधिकारी निमसे, सुभाष तळेकर उपस्थित होते. महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या राज्य अध्यक्ष सुरेखा आंधळे निलेश जाधव, माया बनकर, छाया जाधव, सरला शिंदे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.