अहमदनगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील महापालिकेच्या जागेतील शौचालय पाडून त्या जागेवर व्यापारी गाळे बांधण्यात आले होते. हे गाळे पाडण्याचा आदेश महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी दिला आहे.महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेवर आधी शौचालय होते. तत्कालीन काँग्रेसच्या सत्ताकाळात सदर शौचालय पाडून तिथे व्यापारी गाळे बांधण्याचा ठराव महापालिकेच्या सभेत झाला होता. याविरुद्ध दिलीप नानाभाऊ सातपुते यांनी महापालिकेत तक्रार केली होती. त्यावर महापालिकेच्या उपायुक्तांसमोर गेल्या दोन वर्षांपासून सुनावणी सुरू होती. अनधिकृत बांधकाम नियमित करून घेण्याबाबत बाजार समितीकडून कोणत्याही प्रकारची कागदपत्रे सादर झाली नाहीत. तसेच या बांधकामाबाबत कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. सदरचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे नगररचना विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे बाजार समितीने सदरचे अनधिकृत बांधकाम १५ दिवसांच्या आत स्वत:हून पाडून घ्यावे. अन्यथा, यावर महापालिका कारवाई करणार असल्याचा आदेश उपायुक्तांनी दिला आहे.मुदतीनंतर कारवाई करावी लागल्यास त्याचा खर्चही बाजार समितीकडून वसूल करण्याचा इशारा आदेशात दिला आहे. दरम्यान, शिवसेनेकडून तत्कालीन काँग्रेसच्या सत्ताकाळातील बेकायदेशीर कामांचा हिशोब चुकता केल्याची चर्चा आहे.
महापालिका पाडणार कृषी उत्पन्न बाजार समितीचे गाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 11:19 AM