अहमदनगर: सकल मराठा क्रांती मोर्चा दरम्यान कायगाव टोका येथे झालेल्या दुर्देवी घटनेच्या निषेधार्थ उद्या बुधवारी अहमदनगर शहर बंद व महामार्गावर रास्ता रोको करण्याचा निर्णय सकल मराठा मराठा समाजाच्या मंगळवारी दुपारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.येथील हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे अहमदनगर सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. बैठकीस समन्वयक बाळासाहेब पवार, गोरख शिंदे, अभिषेक कळमकर, सतीष मरकड, संजय गाडे, बहिरणाथ वाकळे, यशवंत तोडमल, रेखा जरे, सविता मोरे, अभिजित वाघ, अभिजित खोसे आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला आंदोलनादरम्यान कायगाव टोका येथे मृत पावलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कायगाव टोका येथील दुर्देवी घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंद हाक देण्यात आली असली तरी नगरमध्ये दुसऱ्या दिवशी बुधवारी बंद पुकारण्यावर यावेळी चर्चा झाली. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एक दिवस उशिराने बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बाळासाहेब पवार यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, मराठा समाजाच्या वतीने लाखोंचे मोर्चे काढण्यात आले. परंतु, त्याची दाखल घेत गेली नाही. मराठा समाजावर हा अन्याय असून, अन्यायाविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा हातात न घेता शहर बंद आणि त्यानंतर शहरातून जाणारे सर्व महामार्गावरील वाहतूक रोखण्यात येईल. आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी सायंकाळी सात वाजता बैठक घेऊन नियोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.शाळा महाविद्यालये आठ दिवस बंदसमाज बांधवाचा आंदोलनादरम्यान दुर्देवी अंत झाला. आठ दिवस शहरासह उपनगरांतील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन स्मायलिंग अस्मिताचे यशवंत तोडमल यांनी केले. शहरातील शाळकरी मुले, महाविद्यालयीन तरुण आठ दिवस शाळेत न जाता घरी बसतील. ते आंदोलनातही सहभागी होणार नाहीत. शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या प्रमुखांची भेट घेऊन आंदोलनाबाबत चर्चा करण्यात येईल. त्यांनी आंदोलनास पाठींबा द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.शहरवाशीयांची गैरसोय टाळण्यासाठी जनजागृतीशहर बंदमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी शहराह उपनगरांत आंदोलनाबाबत जनजागृती केली जाणार आहे. मंगळवारी दिवसभर रिक्षा फिरविण्याचेही यावेळी ठरले.