अण्णा नवथरअहमदनगर : राज्यातील सत्तेच्या बळावर भाजप स्थानिक नेत्यांनी महापालिकेची सत्ता काबीज केली़ परंतु निधीचा तुटवडा, रखडलेल्या विषय समित्या आणि प्रशासनाची उदासीनता, यामुळे अहमदनगर महापालिकेच्या कारभाराचा गाडा रुतला आहे़ गजगतीने सुरू असलेल्या कारभाराला गती मिळेल, असे एकही पाऊल सत्ताधारी भाजपाने महिनाभरात उचलले दिसत नाही़ त्यामुळे पुढे कारभाराला गती मिळेल, अशी चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत़लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत़ आचारसंहिता पुढच्या महिन्यांत लागू होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे शासकीय योजनांतील कामांना कार्यारंभ आदेश देण्याची तयारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सुरू आहे़ जिल्हा परिषदेचे पदाधिकारी तळ ठोकून आहेत़ कारण आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुढील दोन महिने काम करता येणार नाही़ महापालिकेत मात्र थंडा थंडा कुल कुल, असे वातावरण पाहायला मिळत आहेत़ शासकीय निधी आणण्यासाठीही प्रयत्न होताना दिसत नाहीत़ पूर्णवेळ आयुक्त नाही़ त्याचा परिणाम प्रशासकीय कारभारावर होताना दिसत आहे़ अर्थसंकल्प मंजुरीच्या टप्प्यात आहे़ मागील देणी अधिक असल्यामुळे नवीन प्रकल्प प्रस्तावित करणे तर दूरच़ पण नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे़ राज्यात भाजपाची सत्ता आहे़ त्यामुळे निधी मिळेल, अशी अशा होती़ परंतु, सरकारलाही आता निवडणुकीचे वेध लागल्याने त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडे लक्ष देण्यास वेळ नाही़ भाजपाचे खासदार दिलीप गांधीही मैदानात उतरल्याने ते महापालिकेत फिरकत नाहीत़ त्यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी महापालिकेत येत होते़ परंतु त्यांनी महापालिकेकडे पाठ फिरविली आहे़ भाजपाचे इतर पदाधिकारीही फिरकत नसल्याने महापौर एकटे पडल्याची स्थिती आहे़ बैठका घेऊनही काही उपयोग होत नसल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेण्यावर भर दिला आहे़ वास्तविक त्यांच्याकडून सरकार दरबारी पाठपुरावा अपेक्षित आहे़ आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निधी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांच्याकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाही़ सरकारकडे पाठपुरावा नाही आणि स्थानिक पातळीवरील हालचालीही मंदावल्या आहेत़ प्रशासनात यामुळे आनंदीआनंद आहे़ महिना उलटूनही एकही समिती असित्वात येऊ शकलेली नाही़ त्यामुळे कारभाराचा गाडा रुतला आहे़ नवीन समित्या स्थापन करण्यातही पदाधिकाºयांना रस नाही़ नवीन समित्या स्थापन न झाल्याने महापालिकेतील विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती, महिला बालकल्याण सभापतींची दालने रिकामी आहेत़ या विभागातील कर्मचारी गेल्या महिनाभरापासून पदाधिकाºयांच्या प्रतिक्षेत आहेत़ महापालिकेत सत्ता स्थापन होऊनही अर्थसंकल्प महासभेत सादर करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे़ नुतन नगरसेवकांचीही पहिली सभा असणार आहे़ त्यामुळे त्यांच्याकडून काय शिफारशी केल्या जातात, त्यांचा समावेश अंदाजपत्रकात होणार का प्रशासनाचेच अंदाजपत्रक अंतिम होणार, यावरही पुढील वर्षातील विकास कामांचे भवितव्य अवलंबून आहे़
अहमदनगर मनपा : भाजपच्या सत्तेत कारभाराचा गाडा रुतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:48 PM