अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 05:19 PM2024-05-11T17:19:03+5:302024-05-11T17:20:09+5:30
अजित पवारांनी केलेल्या आक्रमक शाब्दिक हल्ल्याला निलेश लंके नेमकं कसं प्रत्युत्तर देणार, याबाबत उत्सुकता होती.
Nilesh Lanke ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल महायुतीचे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पारनेर इथं जाहीर सभा पार पडली. या सभेतून अजित पवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर घणाघाती टीका करत त्यांना पराभूत करण्याचं आवाहन पारनेरकरांना केलं. अजित पवारांनी केलेल्या आक्रमक हल्ल्याला निलेश लंके नेमकं कसं प्रत्युत्तर देणार, याबाबत उत्सुकता होती. लंके यांनी या टीकेवर आज प्रतिक्रिया दिली असून अजित पवारांना थेट लक्ष्य करणं त्यांनी टाळलं आहे. मात्र त्याचवेळी एक आरोप करत या वादाची दिशा बदलण्याचा प्रयत्नही लंके यांच्याकडून करण्यात आला आहे.
अजित पवारांनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारताच निलेश लंके म्हणाले की, "एखादा राजकीय नेता एखाद्या उमेदवाराच्या प्रचारात आल्यानंतर काहीतरी बोलावंच लागतं. नाही बोललं तर खालून टाळ्या पडत नाहीत. अजितदादा बोलत असताना त्यांना मागून एक चिठ्ठी देण्यात आली. ही चिठ्ठी देण्याआधी त्यांच्या भाषणाचा ट्रॅक हा देशाचा विकास, महाराष्ट्राचा विकास असा होता. मात्र चिठ्ठी देऊन त्यांना माझ्यावर व्यक्तिगत बोलण्यास भाग पाडण्यात आलं," असा आरोप लंके यांनी केला आहे. हा आरोप करत निलेश लंके यांनी अजितदादांना माझ्यावर टीका करण्याची इच्छा नव्हती, मात्र विखे पाटील कुटुंबाने त्यांना तसं करण्यास भाग पाडल्याचं सुचवल्याचं दिसत आहे.
दरम्यान, "अजितदादा काहीही बोलले असतील तरी ठीक आहे. त्यांचा माझ्यावर अधिकार आहे, माझाही त्यांच्यावर अधिकार आहे. त्यामुळे १३ तारखेनंतर आम्ही भेटल्यानंतर त्यावर चर्चा करू," असंही निलेश लंके यांनी म्हटलं आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पारनेर येथील बाजार तळावर सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, "महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा पुरता मी बंदोबस्त केला आहे. निलेश लंके तू किस झाड की पत्ती है! मला इथे आल्यानंतर कळालं की महायुतीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जाते आहे. अधिकाऱ्यांना भर सभेतून दम दिला जातो. निलेश लंके ज्या शाळेत शिकतो. त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे," असा हल्लाबोल अजित पवारांनी केला आहे.