- सुदाम देशमुखअहमदनगर - येथील आगरकर मळा, रेल्वे स्टेशन परिसरातील गायके मळा या भागामध्ये दोन महिन्यापासून बिबट्याचा वावर होता. या बिबट्याने अनेक कुत्रे आणि डुकरांचा फडशा पाडला होता. त्यामुळे नागरिक भयग्रस्त झाले होते. दरम्यान या भागातील नागरिकांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. एक महिन्यापासून हा पिंजरा गायके मळा परिसरामध्ये लावण्यात आला होता. आज बुधवारी सकाळी पहाटे हा बिबट्या या लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आपोआप जेरबंद झाला. ही बाब सकाळी निदर्शनास आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
या भागातील युवक कार्यकर्ते अक्षय गायके यांनी सांगितले की, या परिसरात दोन महिन्यापासून बिबट्याचा वावर असल्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. त्यामुळे वनविभागाकडे याबाबत तक्रारही केली होती. वनविभागाने तातडीने पिंजरा लावला, मात्र एक महिन्यानंतर हा बिबट्या जेरबंद होण्यात यश आले.