अहमदनगर : महापालिकेकडून दरमहा मिळणारे पाच लाख रुपये याप्रमाणे ८० लाख रुपये महापालिकेने थकवल्याने अभिकर्ता संस्था यशवंत अॅटोने सोमवारी सकाळपासून शहर बससेवा बंद केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सुरु झालेल्या शहर बस सेवेला शिवसेनेची सत्ता आल्यानंतर एक रुपयाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे अभिकर्ता संस्थेने ही बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. राजकीय कुरघोडीचा फटका शहर बससेवेला बसल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागली आहे.
सध्या शहरातील विविध मार्गांवरुन १५ बसेस सुरू होत्या. वाहनतळ उपलब्ध करून न देणे, नुकसानीपोटी अनुदान न देणे, करारभंग करणे यामुळे ही सेवा बंद करण्याचा निर्णय यशवंत अॅटोचे संचालक धनंजय गाडे यांनी घेतला. गाडे यांनी यापूर्वी दोन वेळा महापालिकेला नोटीस दिली होती. मात्र त्याकडे मनपाने दुर्लक्ष केल्याचा आरोप गाडे यांनी केला आहे.
एका पक्षाने सुरु केलेली शहर बससेवा दुस-या पक्षाने बंद करायची ही राजकीय कुरघोडी आहे. यात सर्वसामान्यांचा बळी जात आहे. हा प्रकार म्हणजे सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे़ रिक्षावाले प्रवाशांची मोठी लूट करतात. रिक्षावाल्यांच्या संघटनांना शिवसेनेचा पाठिंबा आहे. त्यामुळे रिक्षावाल्यांच्या मुजोरीला बळ देण्यासाठीच हा निर्णय घेतला की काय, असा प्रश्न यातून निर्माण होत आहे.-अनिल जगताप