- साहेबराव नरसाळे
अहमदनगर : मागील दोन महिन्यांपासून अहमदनगर कॉलेजमध्ये बीएससी बायोटेक या शाखेसाठी अहमदनगर कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करून घेतले. शुल्क भरून घेतले. त्यानंतर आज शनिवारी (दि. २२) अचानक सर्व विद्यार्थ्यांना अहमदनगर कॉलेज व्यवस्थापनाने आपले ऍडमिशन रद्द करत असून, विद्यार्थ्यांनी जमा केलेले डॉक्युमेंट घेऊन जावे व इतर ठिकाणी आपले ऍडमिशन करून घ्यावे, अशी सूचना कॉलेजच्या वतीने करण्यात आली. अचानक बायोटेक शाखा बंद केल्यामुळे संतप्त पालक, विद्यार्थ्यांनी अहमदनगर कॉलेजसमोर धरणे आंदोलन केले.
अहमदनगर कॉलेजमध्ये बीएससी बायोटेकमध्ये प्रवेश घेतलेले सुमारे ३० ते ३५ विद्यार्थी व पालकांच्या समवेत जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, शिवराष्ट्र सेनेचे संतोष नवसुपे हे अहमदनगर कॉलेजच्या ॲडमिनिस्ट्रेशन कार्यालयासमोर जमा झाले व धरण आंदोलन सुरु केले. पोटे म्हणाले, अचानक बायोटेक शाखा बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना आता पुढील प्रवेश घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. १ ऑगस्टला अहमदनगर कॉलेजमध्ये बीएससी बायोटेकचा वर्ग नव्याने सुरू होणार होता आणि राहिलेल्या केवळ ८ दिवसांमध्ये विद्यार्थ्यांचे इतर कॉलेजमध्ये ऍडमिशन होणे शक्य नाही. इतर सर्वच कॉलेजमध्ये बायोटेक या शाखेसाठी ॲडमिशन पूर्ण झालेले आहेत.
नगर कॉलेजच्या प्रशासनाने या ठिकाणी पुन्हा वर्ग सुरू होणार नाही. आपण आपल्या मुलांची व्यवस्था इतर कॉलेजमध्ये करावी हे ठामपणे सांगितले. त्याबाबत त्यांनी नगर कॉलेजच्या प्राचार्यांशी संपर्क केला असता ते देखील फोन उचलत नसल्याने, त्यांनी विद्यार्थी व पालक यांना घेऊन अहमदनगर कॉलेजच्या ॲडमिनिस्ट्रेशन गेट समोर बीएससी बायोटेक शाखा सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. या संदर्भात सोमवारी सर्व विद्यार्थी व पालक जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत आंदोलन करणार असल्याचे जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी सांगितले. यावेळी संतोष नवसुपे, रावसाहेब काळे, किरण गाढवे, गणेश जाधव, सौरभ गाढवे आदीसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.