सुधीर लंके । अहमदनगर : जिल्हा सहकारी बँक भरतीत काही उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांच्या कार्बन कॉपीत संशयास्पद निळे डाग आढळून आले आहेत, असा निष्कर्ष सहकार विभागाच्या चौकशी समितीने काढला होता. फेरचौकशीत मात्र दिगंबर हौसारे यांच्या समितीने या गंभीर मुद्याकडे दुर्लक्ष करत या कार्बन कॉपी न तपासताच भरतीला ‘क्लिन चीट’ दिली. नगर जिल्हा बँकेच्या ४६५ जागांच्या भरतीत अनियमितता होत असल्याचा संशय ‘लोकमत’ने व्यक्त केल्यानंतर सहकार विभागाने राम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करत भरतीची चौकशी केली. या समितीने लेखी परीक्षेत उत्तरपत्रिकांमध्ये अनियमितपणे फेरफार झाल्याचा आक्षेप नोंदविला होता. समितीने मूळ उत्तरपत्रिका व उमेदवारांच्या ताब्यात असलेली उत्तरपत्रिकांची कार्बन कॉपी याची तपासणी केली. ज्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांबाबत समितीला संशय होता त्या सर्वच उमेदवारांनी कार्बन कॉपी चौकशीसाठी सादर केली नाही. मात्र, ज्या उमेदवारांनी कार्बन कॉपी सादर केली त्यावर संशयास्पद पद्धतीने निळे डाग आढळले. मूळ कार्बन कॉपीवर परीक्षेनंतर कार्बन पेपर सदृश वस्तूने फेरफार करण्यात आला, असा संशय समितीने व्यक्त केला होता.उत्तरपत्रिका परीक्षा हॉलमधून सिलबंद केल्यानंतर उत्तरपत्रिकांच्या तपासणीच्या कोणत्याही प्रक्रियेचे बँकेने अथवा भरतीचे काम करणा-या ‘नाबयर’ संस्थेने चित्रीकरण केलेले नाही. त्यामुळे अनियमितता शोधण्यासाठी समितीने मूळ उत्तरपत्रिका व कार्बन कॉपी तपासून निष्कर्ष काढले होते. भरतीचे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने संशयित ६४ उमेदवारांच्या भरती प्रक्रियेची फेरचौकशी करण्याचा आदेश दिला. या फेरचौकशीत उत्तरपत्रिकांच्या आक्षेपार्ह कार्बन कॉपीही तपासल्या जाणे आवश्यक होते. मात्र, चौकशीसाठी नियुक्त समितीने फॉरेन्सिक तज्ज्ञ जयंत आहेर यांच्यामार्फत केवळ मूळ उत्तरपत्रिका तपासल्या. आहेर यांनी मूळ उत्तरपत्रिकांत उमेदवारांनी जे उत्तरांचे गोल केले आहेत त्यांची रंगछटा ही काळी असल्याचा दोन ओळीचा अहवाल दिलेला आहे. या अहवालाचा आधार घेत हौसारे यांची समिती व विभागीय सहनिबंधक यांनी सर्व भरतीला क्लिन चिट दिली. परीक्षा घेणा-या संस्थेने उत्तरपत्रिका विलंबाने का स्कॅन केल्या? उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करताना त्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण व व्हिडीओ चित्रीकरण का केले नाही? नायबर संस्थेने बँकेला कल्पना न देताच भरतीत इतर संस्थांची मदत कशी घेतली? हे मुद्दे फेरचौकशी समितीने पूर्णत: दुर्लक्षित केलेले दिसतात. फॉरेन्सिक तज्ज्ञाची नियुक्ती करतानाही शासकीय संस्थेकडे हे काम देण्यात आले नाही. फेरचौकशी समिती म्हणते कार्बन कॉपी आम्हाला मिळाल्या नाहीत फेरचौकशी समितीकडे उत्तरपत्रिकांच्या कार्बन कॉपी तपासणीसाठी देण्यात आल्या नव्हत्या. मूळ उत्तरपत्रिका तपासल्याने कार्बन कॉपीची तपासणी करणे आवश्यक वाटले नाही, असे फेरचौकशी समितीचे प्रमुख दिगंबर हौसारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांत फेरफार झाल्याने कार्बन कॉपीतही तसे फेरफार केले गेले. पहिल्या समितीने त्याआधारेच अनियमितता सिद्ध केली आहे. याकडे लक्ष वेधले असता उमेदवारांच्या कार्बन कॉपी आम्हाला मिळाल्या नाहीत, असे हौसारे म्हणाले. पहिल्या समितीला या कार्बन कॉपी उपलब्ध झाल्या. मग, फेरचौकशी समितीला का मिळाल्या नाहीत? असा मुद्दा आता उपस्थित होत आहे.
आपणाकडे तपासणीसाठी केवळ मूळ उत्तरपत्रिका देण्यात आल्या होत्या. त्यात जे गोल काळे करण्यात आले त्याची छटा आपण तपासली. उत्तरपत्रिकांची कार्बन कॉपी तपासणीसाठी देण्यात आली नव्हती. तपासलेल्या उत्तरपत्रिकांत एक उदाहरण असे आढळले की परीक्षा एका व्यक्तीने दिली व त्याच्या जागेवर मुलाखत दुस-या व्यक्तीने दिली, असे सेवानिवृत्ती दस्तावेजांचे राज्य परीक्षक जयंत आहेर यांनी सांगितले.