अहमदनगर : अहमदनगर जिल्हासुद्धा या रानफुलांसाठी व फुलपाखरांसाठी समृद्ध आहे. यावर्षीच्या जिल्हास्तरीय सर्वेक्षणात निरीक्षकांनी जिल्हाभरात जवळ जवळ ९८ प्रजातींच्या आकर्षक व वैशिष्ट्यपूर्ण पावसाळी रानफुलांच्या प्रजातींची तर सुमारे ३२ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद छायाचिञणासह घेतली आहे.जिल्ह्यातील जैवविविधता वाढविण्याच्या उद्देशाने निसर्गअभ्यासक तथा शिक्षक जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली संदिप राठोड, शिवकुमार वाघुंबरे, अनमोल होन, डॉ.अशोक कराळे, ज्योती जाधव, राजेंद्र बोकंद, विकास सातपुते, शैलजा नरवडे, सुधीर दरेकर, स्नेहा ढाकणे, किशोर विलायते आदी २२ निरीक्षकांनी सलग तिस-या वर्षी या रानफुलांचे व फुलपाखरांचे संपुर्ण जिल्हाभर फिरून सर्वेक्षण केले. यावर्षी नगर जिल्ह्यात सवत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने रानफुलांचे हे वैभव जंगले, डोंगराळ भाग व पानथळ क्षेत्रात अनुभवण्यास मिळत आहे.रानफुले व फुलपाखरांचे हे सर्वेक्षण नगर जिल्ह्यात आॅगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात दरवर्षी केले जात असून त्याचा अहवालही वरिष्ठ निसर्गअभ्यासक सस्थांना पाठवला जाणार असल्याचे निसर्ग अभ्यासक जयराम सातपुते यांनी सांगितले. ओळख पटविण्याच्या कार्यात वनस्पती अभ्यासक शैलेंद्र पाटील, चंद्रशेखर मराठे यांनीही सहकार्य केले. जिल्ह्यातील निसर्गवैभवाची जैवविविधता टिकून राहाव, वृद्धींगत व्हावी याचप्रमाणे निसगार्तील दुर्मिळ प्रजातींचे रक्षण व संवर्धन व्हावे या उद्देशाने रानफुलांचे सर्वेक्षण करत असतानाच आकर्षक, दुर्मिळ तथा औषधी प्रजातींच्या रानफुलांच्या बीयांचे संकलन व बीयांचे रोपणही टिममधील सदस्यांनी केले. या सर्वेक्षणानुसार भंडारदरा, हरिश्चंद्रगड ही ठिकाणे वैविध्यपुर्ण प्रजातींच्या रानफुले व फुलपाखरांसाठी अतिशय वैभव संपन्न असल्याचे आढळुन आले. पेमगीरी, विळदघाट, वृद्धेश्वर, करंजीघाट, मोहटे, मुळा व जायकवाडी धरण परिसर, आगडगाव, डोंगरगण, गर्भगीरी ठिकाणीही रानफुलांची वैविध्यता दिसून आली.जिल्हाभरातील विविध भागात यावर्षी पंद, पिवळी तिळवण, धोतरा, कल्प, गुलबाक्षी, दहाण, रानतेरडा व पाणतेरड्याच्या प्रजाती, शिंदळवन, सोनकी, पित्तपापडा, नीसुरडी, सोनसरी, घोडेगुई, झरवड, चिमनाटी, तुंबा, कल्प, विविध रंगी घाणेरी, कुरडु,बेरकी, गुलाबी, पिवळी व दुरंगी बाभुळ, आघाडा, रानकराल, कालमाशी, वासका, चिमनाटी, सोळन आदी रानफुले मुख्यत्वे लक्षवेधी ठरत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात ९८ प्रजातींचे रानफुले अन ३२ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:48 PM