अहमदनगर : रुग्णांना भेटण्याचा अट्टाहास करत जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी चांगलाच राडा केला. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर व नर्सला शिवीगाळ करत पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली. सोमवारी सायंकाळी ६.३०ते ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी सचिन श्याम बैद व पोलीस कर्मचारी अमोल ज्ञानेश्वर बर्डे यांनी स्वतंत्ररीत्या दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रकांत आनंद उजागरे (रा. मराठी मिशन कम्पाउंड, स्टेशनरोड, अहमदनगर), संदीप उत्तम मरकड (रा. मिरी, ता. पाथर्डी) यांच्यासह अनोळखी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा रुग्णालयात वाहने आणण्यास व रुग्णांना भेटण्यास सध्या नातेवाइकांना बंदी आहे. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उजागरे, मरकड यांच्यासह आठ ते दहा जणांनी आम्हाला नातेवाइकांना भेटू द्या, असा आग्रह केला. यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी तुम्हाला नातेवाइकांना भेटता येणार नाही, असे सांगितले. यावेळी जमावाने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयासमोर येऊन शिवीगाळ केली. यावेळी महिला कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. या घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जमावाने पोलिसांनाही धक्काबुक्की, दमदाटी करत राडा केला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे पुढील तपास करत आहेत.