अहमदनगर : सन २०१७-१८ च्या सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात १० एप्रिलपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात १२७.३८ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून १३८.९६ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील १४ सहकारी व ८ खासगी असे २२ कारखाने सुरू झाले होते. यातील आठ कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता झाली आहे. कर्जतच्या अंबालिका (इंडेकॉन) या खासगी साखर कारखान्याने ऊस गाळप व साखर उत्पादनात जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये आघाडी घेतली आहे. या कारखान्याने आतापर्यंत १४ लाख १८ हजार ९९० मेट्रिक टन उसाचे गाळप करून १६ लाख ४९ हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन करीत ११.६३ टक्के सरासरी साखर उतारा मिळविला आहे. सहकारी कारखान्यांमध्ये भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेत ११ लाख ६ हजार ९५५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १२ लाख ४३ हजार ८५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. त्याखालोखाल संगमनेरच्या थोरात सहकारी कारखान्याने १० लाख ७१ हजार ८० मेट्रिक टन उसाचे गाळप करून १२ लाख १४ हजार २२० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील तनपुरे (राहुरी), श्रीगोंदा, कुकडी, श्री क्रांती शुगर (पारनेर), अंबालिका (कर्जत), साईकृपा-१, जय श्रीराम शुगर, पियुश शुगर (संगमनेर) या आठ कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता झाली आहे.विखेचा साखर उतारा सरस; पियुशचा सर्वात कमीप्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विखे सहकारी कारखाना सरासरी साखर उताऱ्यात अहमदनगर जिल्ह्यात सरस ठरला आहे. या कारखान्याने ११.७८ टक्के एवढा सर्वाधिक उतारा मिळविला आहे. त्यानंतर अंबालिका कारखान्याचा ११.६३, तनपुरे कारखान्याचा ११.५४, थोरात कारखान्याचा ११.३४, अगस्ती व ज्ञानेश्वरचा ११.२४, गणेशचा ११.१९ टक्के साखर उतारा आहे. संजीवनी, काळे, अशोक, वृद्धेश्वर, मुळा, कुकडी,क्रांती शुगर,गंगामाई, साईकृपा-१,प्रसाद शुगर, युटेक शुगर या कारखान्यांचा साखर उतारा ११ टक्क्यांच्या आत आहे. तर जय श्रीराम शुगर, पियुश, केदारेश्वर या तीन कारखान्यांच्या उतारा १० टक्क्यांच्या आत आहे. पियुष शुगरचा सर्वात कमी ८.७१ टक्के एवढा सरासरी उतारा आहे.