- सचिन धर्मापुरीकर कोपरगाव (जि. अहमदनगर) : तालुक्यातील मांढरे वस्ती व मोरवीस मधील आदिवासी तसेच बहुजन समाज बांधवांना राहत्या जागेत घरकुल बांधुन द्यावीत तसेच गाव पंचनाम्याच्या आधारे तात्काळ जातीचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड द्यावेत, या मागणीसाठी एकलव्य आदिवासी परिषदेच्या वतीने कोपरगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
एकलव्य भिल्ल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात मांढरे वस्ती, मुर्शतपूर येथे आदिवासी बहुजन समाजातील समाज बांधव गट नंबर ५५ / ५ मध्ये पिढ्यान पिढ्यांपासून राहतात परंतु काही लोकांनी पाटबंधारे कालवा यांच्या विरोधात जाणून-बुजून आदिवासी बहुजन समाज बांधवांना त्रास देण्याच्या हेतूने न्यायालयात तक्रारी दाखल करून अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न चालू आहे. परंतु हे जर अतिक्रमण काढायचे असेल तर, शेकडो कुटुंबांचे पुनर्वसन करणे ही शासनाची जबाबदारी आहे. मोरवीस या गावात आदिवासी बहुजन समाजातील दीडशे ते दोनशे घर आज पिढ्यान पिढ्यांपासून राहतात तरीपण या जागेवर अद्याप घरकुल दिले जात नाही. ही राहती जागा समाज बांधवांच्या नावे करून त्यांना तातडीने घरकुल देण्यात यावे, तसेच कोपरगाव तालुक्यात आदिवासी बांधवांसाठी गावपंचनाम्याच्या आधारे जातीचे दाखले रेशन कार्ड, आधार कार्ड तसेच विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी मंगेश औताडे, प्रदेश उपाध्यक्ष किरण गांगुर्डे, आरपीआयचे राज्य सचिव दीपक गायकवाड, नवनाथ वाघ, अंबादास धनगर, प्रमोद बारहाते, शोभाताई सोनवणे, गुलाब बर्डे, आदिती बाराहाते, अशोकराव वाघमारे, निसार शेख, दुशिंग यांची भाषणे झाली. मोर्चात कोपरगाव तालुक्यासह चांदवड, नांदगाव, कळवण, सटाणा, निफाड तालुक्यातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.