मुंबई : अहमदनगरमध्ये झालेल्या आगीच्या घटनेनं महाराष्ट्र हदरुन गेला. जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत 10 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. अतिदक्षता विभागात ही आग लागल्यामुळे मोठी खळबळ माजली. या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तर आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखाच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अति दक्षता विभागाला आज सकाळी साडेदहा वाजता शॉक सक्रीट मुळे आग लागली. या विभागात 17 कोवीड रूग्ण दाखल होते. यापैकी दहा रुग्णांच्या होरपळून मृत्यू झाला तर 1 रूग्ण अत्यवस्थ आहे. इतर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी दिली. भोसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली आहे. ते पुढे म्हणाले की, नाशिक येथे झालेल्या गॅस गळतीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते. मात्र तरीही दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची चौकशी करण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदतदरम्यान, या आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली. या दुर्घटनेत 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून 7 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेची माहिती मी तातडीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिली. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत असून या दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल आणि त्याचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेशया दुर्घटनेप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डातआज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.