अहमदनगर: जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील अग्निकांडप्रकरणी दाखल गुन्ह्यातील चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर या चौघांच्यावतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागल्यानंतर तेथे नियुक्तीस असलेले डाॅक्टर व नर्स यांचा हलगर्जीपणा पोलीस तपासात समोर आला. त्यानंतर या घटनेप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक केली होती.
न्यायालयाने या चौघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडी संपल्याने या चौघांना शुक्रवारी तपास अधिकारी संदीप मिटके यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. तिवारी यांच्यासमोर हजर केले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने चौघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
डॉ. विशाखा शिंदे यांचे निलंबन रद्द
अग्निकांडप्रकरणी तीन परिचारिकांसह वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे आरोग्य सेवा उपसंचालकांनी निलंबन केले होते. मात्र, शिंदे या खासगी कोट्यातील सीपीएस ऑर्थोपेडिक रेसिडंट असल्याचे निदर्शनास आल्याने शुक्रवारी त्यांचा निलंबन आदेश रद्द करण्यात आला. दरम्यान, परिचारिकांवरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी यासाठी परिचारिकांनी पुकारलेले काम बंद आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच होते.