अहमदनगर : डोंगरद-या, हिरवाईने नटलेला परिसर आणि समुद्र सपाटीपासून २९०० फूट उंचीवर असलेला मांजरसुंबा गड म्हणजेच नगरचे हिलस्टेशन विकासापासून दूर आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या गडावर जाणा-या पर्यटकांसाठी काहीच सुविधा नाहीत. या ऐतिहासिक गडाचीही मोठी पडझड झाली आहे.मांजरसुंबा येथील डोंगरावर बांधलेला महाल म्हणजे मांजरसुंबा गड होय. या गडाशेजारी जलविहारासाठी तयार केलेला तलाव, त्यात पाणी भरण्यासाठी हत्ती मोट, स्नानासाठीचा हमामखाना आदी ऐतिहासिक ठिकाणे येथे आहेत. नगरपासून २० किलोमीटर अंतरावर डोंगरगण आणि गोरक्षनाथ गडाच्या मध्यभागी असलेल्या डोंगरावर निझामशाहीतील बादशहांच्या विश्रांतीसाठी हा महाल बांधण्यात आला.
‘मर्दानखाना’ या नावाने ओळखल्या जाणा-या या महालाचे काही अवशेषच आता उरले आहेत. ही जागा मांजरसुंबा गावाची असून येथे जाण्यासाठी ग्रामस्थांनी २ लाख रूपये खर्चून रस्ता केला पण तो आता खराब झाला आहे. सध्या मात्र हा रस्ताही खराब झाला आहे.
पॅराग्लायडिंग व ट्रेकिंगसाठी येतात पर्यटक
मांजरसुंबा गडावर पॅराग्लायडिंग व ट्रेकिंगसाठी पर्यटक येतात. या ठिकाणी चित्रपटांचे चित्रीकरणही होते. सुटीच्या दिवशी तर पर्यटकांची मोठी संख्या येथे असते. महालाच्या समोरील बाजूस तीन कारंजी आहेत. डोंगरावर इतक्या उंचीवर तयार केलेला पोहण्याचा तलाव हे इथले वैशिष्ट्य आहे. हा तलाव व कारंजासाठी डोंगराच्या पोटात टाक्या तयार करून तेथे पावसाचं पाणी साठवलं जातं. हे पाणी उपसण्यासाठी हत्ती मोट होती. गार व गरम पाण्याची सोय असलेला हमामखाना महालाजवळच आहे.
पुरातत्व विभागाकडे नोंद नाही
मांजरसुंबा गडाची पुरातत्व विभागाकडे नोंद नाही़ ही जागा ग्रामपंचायतीची आहे. या ठिकाणी पावसाळ्यात धबधबे असतात. तर इतर वेळी शुद्ध हवा असते, या ठिकाणी रोप वे करण्याचा प्रस्ताव आहे तर हॉटेल व इतर सोयीसुविधा देण्याची गावाची तयारी आहे तसेच वन विभागाने या ठिकाणी वृक्षारोपण करून हिरवाई करावी, असे मांजरसुंबाचे सरपंच जालिंदर कदम यांनी सांगितले.