अहमदनगर: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला आज सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत होरपळून १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण ५० ते ८५ वयोगटातील आहेत.
आयसीयू कक्षामध्ये २५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान या कक्षाला सकाळी आग लागली आणि या आगीमध्ये हे सर्व रुग्ण गंभीर भाजले. त्यामध्ये सात जण सात जण अत्यंत गंभीर असून राहिलेल्या २० जणांना तातडीने इतर कक्षांमध्ये हलवण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन देण्याची कार्यवाही तातडीने सुरू झाली.
...अन् होत्याचं नव्हतं झालंविवेक खाटिक यांच्या वडिलांचा आगीत होरपळल्यानं मृत्यू झाला. ते गेल्या १० दिवसांपासून उपचार घेत होते. विवेक यांचे वडील कडूबाळ गंगाधर खाटिक (वय ६५ वर्षे) यांचा रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डला लागलेल्या आगीत मृत्यू झाला. 'आग लागली त्यावेळी आई वडिलांजवळ होती. मी बाहेर आलो होतो. आग लागल्याचं समजताच मी रुग्णालयात धाव घेतली. मात्र वडिलांना वाचवू शकलो नाही,' असं विवेक यांनी सांगितलं.
आयसीयूला आग लागताच आधी आईला बाहेर काढण्यात आलं. मी त्यावेळी बाहेर होतो. मी पळत पळत रुग्णालयात आलो. आगीची तीव्रता जास्त असल्यानं आई मला आता जाऊ देत नव्हती. पण तरीही मी आत गेलो. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता, अशा शब्दांत विवेक यांनी घडलेला प्रसंग सांगितला.
आगीत चार महिला व सहा पुरुषांचा मृत्यू रामकिसन विठ्ठल हरपुडे (वय ७०), सिताराम दगडू जाधव (८३), सत्यभामा शिवाजी घोडचौरे (६५), कडूबाळ गंगाधर खाटीक (६५), शिवाजी सदाशिव पवार (८२), दीपक विश्वनाथ जेडगुले (५७), कोंडाबाई मधुकर कदम (७०), आसराबाई नांगरे (५८ ), छबाबी अहमद सय्यद (६५) व एक अनोळखी.