- शेखर पानसरेसंगमनेर - मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली, या कारवाईत जेसीबी आणि ट्रॅक्टर जप्त केला. मंगळवारी (दि.०२) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील कौठे धांदरफळ येथे ही कारवाई करण्यात आली. जेसीबी आणि ट्रॅक्टर संगमनेर शहर पोलिस वसाहतीमध्ये उभे करण्यात आले आहेत.
संगमनेर तहसील कार्यालयातील प्रभारी तहसीलदार गणेश तळेकर, महसूल नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी ही कारवाई केली. कौठे धांदरफळ येथे मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन सुरू असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार तळेकर यांना मिळाली. कारवाईसाठी त्यांच्यासमवेत तलाठी युवराज जारवाल, अलोक चिंचोलकर, बाजीराव गडदे हे सर्वजण खासगी वाहनांनी कौठे धांदरफळ येथे पोहोचले. जेसीबीने मुरुमाचे उत्खनन करत तो ट्रॅक्टरमध्ये भरला जात होता. जेसीबी आणि ट्रॅक्टर राहुल घुले याची आहेत. ही वाहने ताब्यात घेण्यात आली असून पंचनामा करण्यात आला आहे. अशी माहिती प्रभारी तहसीलदार तळेकर यांनी दिली.