अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांचे सर्वप्रथम आभारमानतो, अशी उपरोधीक प्रतिक्रिया भाजपचे अहमदनगर लोकसभा मतदरासंघातील उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी दिली.आतापर्यत झालेल्या मतमोजणीत विखे यांना १ लाख ३९ हजार मतांची आघाडी घेऊन विजयाकडे घोडदौड सुरू केली. हा कल पाहून त्यांना ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने प्रतिक्रिया विचारली असता डॉ. सुजय विखे म्हणाले, या मतमोजणीतील आघाडीसाठी शरद पवार व बाळासाहेब थोरात यांचे आभार मानतो. लोकसभा निवडणुकीसाठी डॉ. विखे यांनी ही जागा काँग्रेससाठी सोडण्याची मागणी केली होती. मात्र शरद पवार यांनी विखे यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी करण्याची अट घातली होती. तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही राधाकृष्ण विखे यांना राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. या सर्व घडामोडीनंंतर डॉ.सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय बाळासाहेब थोरात यांनीही विखेंविरोधात जोरदार मोहीम राबविली होती. त्यामुळेच मतमोजणीतील आघाडीनंतर डॉ. सुजय विखे यांनी अशी खोचक प्रतिक्रिया दिली असावी. डॉ. सुजय विखे यांनी पहिल्याच फेरीपासून आघाडी घेतली होती. राष्टÑवादीचे उमेदवार संग्राम जगताप हे पिछाडीवर राहिले. बाराव्या फेरीनंतर डॉ.सुजय विखे यांनी १ लाख ३९ हजार मतांची आघाडी मिळवली आहे.