अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यात मुख्य लढत होत आहे. काँग्रेसच्या मतदारसंघावर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे गेली. निवडणुकीपुर्वी ही जागा काँग्रेसला मिळण्यासाठी विरोेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. मात्र शरद पवार यांनी विखे यांना जागा सोडली नाही. त्यामुळे डॉ.सुजय विखे यांनी भाजपात दाखल होत निवडणुक लढवली. भाजपने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट करून डॉ.सुजय विखे यांना मैदानात उतरवले तर राष्ट्रवादीने ऐनवेळी शहराचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजप हा गड कायम राखील की राष्ट्रवादी हातातून गेलेला गड परत मिळविले का ? याबाबत उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून अहमदनगरमध्ये पहिल्या फेरीनंतर १२ हजार मतांनी भाजपचे डॉ.सुजय विखे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना २९ हजार ६९४ मतं मिळाली असून संग्राम जगताप १७ हजार ३४८ मतं पडली आहेत.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ५४ हजार २४८ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६४.२६ टक्के मतदान झालंय.
गेल्या निवडणुकीत भाजपचे दिलीप गांधी यांना ६ लाख ३ हजार ९७६ मतांसह विजय साकारला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिवगंत राजीव राजळे यांना ३ लाख ९५ हजार ५६९ मतं मिळाली होती.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सरासरी 64.26 टक्के मतदान झाले. सर्वा धिक मतदान राहुरी मतदारसंघात झाले असून सर्वात कमी मतदान अहमदनगर शहर मतदारसंघात झाले आहे. शेवगावमध्ये ६३.४० टक्के, राहुरी ६६.७७ टक्के, पारनेर ६६.१० टक्के, अहमदनगर शहर ६०.२५ टक्के, श्रीगोंदा ६४.७५ तर कर्जत-जामखेडमध्ये ६४.१० टक्के मतदान झाले.