अहमदनगर : संपूर्ण राज्य आणि प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड’चे वितरण ६ जानेवारीला होणार आहे. ‘लोकमत’चे जिल्हा पातळीवरील ज्युरी मंडळ आदर्श सरपंचांची निवड करणार आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन आदर्श सरपंचांचा गौरव करण्यात येणार आहे.गावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभा-यांना ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अॅवॉर्ड-२०१७’ ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला आहे. गावाच्या विकासासाठी झटणा-या सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. बीकेटी टायर्स हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक, ‘पतंजली आयुर्वेद’ हे प्रायोजक तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत. पहिल्याच वर्षी या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. नगर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमधून मोठ्या प्रमाणात पुरस्कारांसाठी प्रस्ताव दाखल झाले आहेत. जनतेनेही उत्स्फूर्तपणे सरपंचांची नामांकने दाखल केली आहेत. त्यामुळे पुरस्कारांबाबत प्रचंड चुरस आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.सरपंचांनी गावातील जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी या अकरा कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करुन या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय ‘उदयोन्मुख नेतृत्व’ व सर्वांगीण काम करणा-या सरपंचासाठी ‘सरपंच आॅफ द इयर’ असे दोन स्वतंत्र पुरस्कार आहेत. असे एकूण तेरा पुरस्कार दिले जाणार आहेत. जिल्हा पातळीवर पुरस्कार प्रदान सोहळा झाल्यानंतर या विजेत्यांचे राज्यपातळीसाठी नामांकन होईल. त्यातून राज्यातील आदर्श सरपंच ठरतील. राज्यात कोण आदर्श ठरणार? याची प्रचंड उत्सुकता आहे.जिल्हास्तरावरील पुरस्कारांची निवड करण्यासाठी ‘लोकमत’ने तज्ज्ञ व्यक्तींचे निरपेक्ष ज्युरी मंडळ स्थापन केले आहे. या ज्युरींमार्फत प्रत्येक नामांकनाची छाननी होऊन विजेत्यांवर मोहोर उमटवली जाईल. त्यामुळे विजेते कोण राहणार? हे सोहळ्यातच स्पष्ट होणार आहे.
हे आहे ज्युरी मंडळ
जिल्हास्तरावरील पुरस्कारांची निवड करण्यासाठी ‘लोकमत’ने तज्ज्ञ व्यक्तींचे निरपेक्ष ज्युरी मंडळ स्थापन केले आहे. यात आदर्श गाव योजना प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रशांत शिर्के, सेंटर फॉर स्टडीज् इन रुरल डेव्हलपमेंट (सीएसआरडी) संस्थेचे संचालक डॉ़ सुरेश पठारे, समाजकल्याण विभागाचे निवृत्त उपसंचालक सी़ व्ही़ नांदेडकर, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी राजेंद्र पवार यांचा ज्युरी मंडळात समावेश आहे.
‘असे बदलू गाव ’ या विषयावर प्रेरक परिसंवाद
‘लोकमत सरपंच अॅवॉर्डस्’ या गौरव वितरण सोहळ्यात आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, राष्ट्रपती पारितोषिक विजेते सरपंच भास्करराव पेर पाटील (पाटोदा, जि़ औरंगाबाद) तसेच शितलवाडी (ता़ रामटेक, जि़ नागपूर) ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच योगिता गायकवाड यांचा ‘असे बदलू गाव’ या विषयावर परिसंवाद होणार आहे़ ‘लोकमत सरपंच अॅवॉर्डस्’ पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (दि़ ६) सकाळी ११ वाजता न्यू टिळक रोडवरील सरस्वती सांस्कृतिक हॉलमध्ये होणार आहे. कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभय महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने उपस्थित राहतील.