लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : नगरसह सुपा, शिरूर पुणे परिसरात रस्तालूट व महिलांची दागिने ओरबाडणा-या राणी ठुबेच्या टोळीतला मास्टरमाइंड राजू सुनील म्हस्के याला रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माळीवाडा परिसरातून अटक केली. त्याच्याकडून ९३ हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
नगर व पुणे पोलीस राजू म्हस्के (रा. कोरेगाव ता. श्रीगोंदा) याचा गेल्या अनेक दिवसांपासून शोध घेत होते. तो मात्र दोन्ही जिल्ह्यांतील पोलिसांना गुंगारा देत होता. म्हस्के हा येथील माळीवाडा परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. माहितीनुसार पथकाने सापळा लावून म्हस्के याला ताब्यात घेतले. म्हस्के याच्यासह राणी बाळासाहेब ठुबे (रा. एमआयडीसी, नगर), बजरंग सतीश साबळे (रा. कोरेगाव ता. श्रीगोंदा), रणजित बबन पोळ (रा. येळू ता़ श्रीगोंदा), दाऊद श्याम शेख (रा. कोरेगाव) यांनी संगनमताने विविध ठिकाणी रस्तालुटीचे गुन्हे केले आहेत. शिरूर येथे १४ जानेवारी रोजी मीना दिवेकर यांना रस्त्यात अडवून त्यांचे २६ हजार रुपयांचे मंगळसूत्र या टोळीने चोरून नेले होते. तसेच बु-हाणनगर येथील शीतल एकनाथ सोनवणे या महिलेचे म्हस्के याने २१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने विश्वासघाताने लंपास केले होते. म्हस्के याला पुढील कारवाईसाठी भिंगार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कैलास देशमाने, सुधीर पाटील, श्रीधर गुट्टे, कॉन्स्टेबल सोन्याबापू नानेकर, अशोक गुंजाळ, दत्ता गव्हाणे, दीपक शिंदे, रवी सोनटक्के, विजय ठोंबरे, मनोज गोसावी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
- दागिने विकण्याची राणीवर जबाबदारी
- विविध ठिकाणी रस्तालूट करून चोरलेले दागिने राणी ठुबे हिच्या माध्यमातून विकले जात होते. महिला असल्यामुळे तिच्याकडे दागिने घेण्यास सराफाला संशय येत नसे, याचा फायदा घेऊन ते सोन्याचे पैशांत रूपांतर करत होते. लुटीसाठी ही टोळी एका इंडिका कारचा वापर करत होती.