मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेत प्रशासकीय मान्यता न घेताच ८ लाख रूपयांची बुके खरेदी झाल्याची कबुली नगरविकास खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य विधानसभेत दिली.अहमदनगर महानगरपालिकेतील नियमबाह्य देयकांबाबत पारनेरचे आमदार विजय औटी यांनी नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारला होता. अहमदनगर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून प्रशासकीय मान्यता न घेता तयार करण्यात आलेल्या देयकांबाबतच्या प्रश्नास उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेतील नियमबाह्य गैरकारभाराची कबुली दिली. अहमदनगर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून सादर करण्यात आलेल्या ४७ लाख ५० हजार रूपयांच्या किरकोळ देयकांसह ८ लाख रूपयांच्या बुके खरेदीला प्रशासकीय मान्यता न घेताच काम करून देयके तयार करण्यात आली. याप्रकरणी उद्यानप्रमुखांना महानगरपालिकेच्या आयुक्तांनी नोटीस बजावल्याचे १२ मे २०१८ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे काय? असल्यास या देयकांच्या नस्त्याही महानगरपालिकेतून गहाळ झाल्या असून ठेकेदारांनी या नस्त्या पळविल्याचे उद्यान विभागाकडून सांगण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय? असल्यास या प्रकरणाची सरकारने चौकशी केली आहे काय? चौकशीत काय आढळून आले, वा त्यानुसार दोषींविरूद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे? नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? असे प्रश्न आमदार औटी यांनी विचारले होते.त्यावर लेखी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ४७ लाख ५० हजार रूपयांच्या किरकोळ देयकांसह ८ लाखांच्या बुके खरेदीला प्रशासकीय मान्यता न घेताच काम करून देयके तयार केल्याचे निदर्शनास आल्याची कबुली दिली. तसेच याबाबत आयुक्तांना नोटीस बजावल्याचे स्पष्ट केले.४प्रशासकीय मान्यता न घेता सादर केलेल्या देयकांच्या सर्व फाईल्स उद्यान विभाग प्रमुखांकडे उपलब्ध आहेत. याप्रकरणी अहमदनगर महानगरपालिकेने उद्यान विभागप्रमुखांविरूद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे.