अहमदनगर: राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले असले तरी नगरमध्ये मात्र सेना-राष्ट्रवादीने भाजपाला बरोबर घेऊन जिल्हा नियोजन समिती विजयाचे गणित मांडले जात आहे. महापालिकेतील नगरी राजकारणाचा हा अनोखा पॅटर्न पुन्हा गाजण्याची चिन्हे आहेत. महापालिकेतून जिल्हा नियोजन समितीवर तीन पैकी एक जागा बिनविरोध झाली. उर्वरित सर्वसाधारण व नागरिकांचा मागास प्रवर्ग, या दोन जागांसाठी मंगळवारी मतदान होत आहे.
या निवडणुकीत सर्वसाधारण गटात सेनेचे अनिल शिंदे व अमोल येवले हे दोघे एकमेकांच्या विरोधात मैदानात आहेत. सेनेचे महापालिकेतील संख्या बळ २४ होते. परतु, सारिका भुतकर यांच पद रद्द झाल्याने त्यांची संख्या आता २३ झाली आहे. राष्ट्रवादी व सेनेने भाजपच्याविरोधातील अर्ज मागे घेऊन भाजपाला एकप्रकारे मदतच केलेली आहे. राष्ट्रवादीची संख्या १८ आहे. महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर भाजपची सत्ता आहे. मागास प्रवर्गातून राष्ट्रवादीचे नगरसेवक विनीत पाऊलबुधे हे निवडणुक मैदानात आहेत. तर भाजपाचे संख्याबळ १४ आहे. महापालिकेतील भाजप व राष्ट्रवादी यांच्यातील आजवरचे संबंध पाहता भाजपचे सर्व नगरसेवक राष्ट्रवादीचे पाऊलबुधे यांना साथ देतील, असे दिसते. याशिवाय काँग्रेसचे पाच नगरसेवकही त्यांच्यासोबत असतील.
सर्वसाधारण गटात सेनेच्या दोघांना विजयासाठी अन्य पक्षांची साथ घ्यावी लागेल. सेनेचे अनिल शिंदे यांचे नाते गोते व त्यांचे वैयक्तिक संबंध, यामुळे त्यांना राष्ट्रवादी, भाजप, बसपा, काँग्रेस आणि सेना, या पक्षातील कमी-अधिक प्रमाणात मते टाकतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु, सेनेचे उपनेते अनिल राठोड हेही नगरसेवकांशी संपर्क ठेवून आहेत. अनिल शिंदे नगरसेवकांच्या वैयक्ति गाठीभेटी घेत असून, त्यांच्याविरोधात राठोड स्वत: सक्रिय आहेत. त्यामुळे या जागेसाठी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.
सेनेने एका जागेसाठी भाजपाला मदत केली आहे. त्याची परतफेड भाजप करील. पण, ते शिंदे व येवले, यांच्यापैकी कुणाला मते टाकतात, यावर बरेच अवलंबून आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, बसपाच्या नगरसेवकांशी शिंदे यांचे सलोख्याचे संबंध असल्याने त्यांना तिकडूनही मदत होईल. सेना व राष्ट्रवादीने माघार घेतल्याने भाजपची एक जागा बिनविरोध झाली. त्याची परतफेड दोन्ही पक्षांना अपेक्षित आहे.
आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
जिल्हा नियोजनच्या निवडणुकीत सेनेत फूट पडून एका जागेसाठी सेनेचे दोन उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. सेनेचे उमेदवार अमोल येवले हे उपनेते अनिल राठोड यांचे समर्थक आहेत. सेनेचे दुसरे उमेदवार अनिल शिंदे हे राठोड विरोधी गटाचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे शिंदे यांचा वारु रोखण्यासाठी राठोड यांनी येवले यांच्यामागे ताकद उभी केली आहे. परंतु, ती कितपत फळाला येते निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. राष्ट्रवादीकडे स्वत:चे १८, भाजपचे १४ आणि काँग्रेसचे ५ असे संख्याबळ आहे. याशिवाय सेनेतील राठोड विरोधी गटाचे नगरसेवक राष्ट्रवादीला मदत करु शकतात, तर राठोड यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीसह भाजप, काँग्रेस, बसपा आणि सेनेचे काहीजण एकत्र येण्याची शक्यता आहे. ही निवडणूक नियोजनची असली तरी जादुई आकडा गाठण्यासाठी आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विधानसभेनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे