अहमदनगर : विकासकामाच्या फायलीवर सही केली नसल्याच्या रागातून प्रभारी उपायुक्तांच्या अंगावर पैसे फेकून लाच देण्याचा प्रयत्न करणारा ठेकेदार शाकीर शेख (रा. झेंडीगेट) याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी प्रभारी उपायुक्त दिगंबर कोंडा यांनी फिर्याद दाखल केली आहे. महापालिकेत सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता हा प्रकार घडला. ठेकेदार शाकीर शेख याने कोंडा यांच्या दालनात घुसून फायलीवर सही का केली नाही, अशी विचारणा केली. स्थळ पाहणी केल्याशिवाय फायलीवर सही करणार नाही, असे कोंडा यांनी बजावले. मात्र ठेकेदार ऐकण्यास तयार नव्हता. यावेळी शेख याने पैसे घेतल्याशिवाय फाईलवर सह्या होत नसल्याचा आरडाओरडा केला. मात्र ठेकेदाराने कोंडा यांच्या अंगावर पैसे फेकले आणि त्याचे चित्रीकरण केले. तसेच कोंडा यांना शिविगाळ करून विकासकामाची फाईल जबरदस्तीने घेऊन गेला़.या प्रकाराची कोंडा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सदर ठेकेदाराविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. कोंडा यांच्या फिर्यादीनुसार रात्री बारा वाजेच्या सुमारास तोफखाना पोलीसांनी शेख याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सोेने हे करत आहेत.