अहमदनगर - महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुराळा एकदाचा रविवारी शांत झाला. ७० टक्के मतदान झाल्यानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याचे अंदाज बांधले जात आहेत. ‘लोकमत’ने व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस एक क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता व्यक्त झाली आहे.
महानगरपालिकेसाठी रविवारी ७० टक्के मतदान झाले. गत पंचवार्षिकलाही ७१ टक्के मतदान झाले होते. दुपारपर्यंत मतदार फारसे बाहेर पडले नाहीत. दुपारनंतर मतदारांंचा ओघ वाढला होता. रात्री साडेआठपर्यंत मतदानासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. हे वाढीव मतदान नक्की कोणाच्या पारड्यात जाणार? यासाठी निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. सर्व प्रभागांतील उमेदवारांचा धांडोळा घेतला असता राष्ट्रवादी काँग्रेस एक क्रमांकावर येण्याची शक्यता आहे. भाजपचे सध्या ९ नगरसेवक आहेत. त्यातील श्रीपाद छिंदम, दत्ता कावरे आणि मनीषा काळे-बारस्कर या तीन नगरसेवकांनी भाजपकडून निवडणूक लढविली नाही. त्यामुळे सहा विद्यमान नगरसेवकांनाच उमेदवारी मिळाली होती.
अन्य पक्षातील उमेदवारांपुढे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे तगडे उमेदवार असल्याने भाजपची अनेक प्रभागात कोंडी होण्याची शक्यता आहे. केडगावमधील दोन प्रभागात भाजपला पाच जागा, तर शिवसेनेला तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. याबाबींमुळे भाजपची संख्या वाढली तरी ती २० च्या पुढे जाण्याची शक्यता नसल्याचा अंदाज आहे. सावेडी उपनगर, मध्य सावेडीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांची सरशी आहे. शिवसेनेचे जुन्या शहरात प्राबल्य आहे. त्यामुळे एक क्रमांकासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्येच रस्सीखेच असून भाजप तिसऱ्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे.
मतदार यादीने केली कुुटुंबाची ताटातूट
महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीत एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या भागातील मतदान केंद्रांवर आल्याने अनेकांची धावपळ उडाली. मतदार यादीतील या विसंगतीमुळे काही मतदारांना त्यांचे नाव शोधण्यातच दिवस गेला. काही मतदारांची नावे चुकली होती. मतदारांना राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या स्लिप वरील मतदान केंद्राचा क्रमांक व प्रत्यक्षातील क्रमांक याच्यातही विसंगती होती.
असा आहे अंदाज
भाजप - १८ ते २० जागाशिवसेना - १९ ते २१ जागाराष्ट्रवादी - २१ ते २३ जागाकाँग्रेस - ३ ते ४ जागाइतर - ३ ते ४ जागा