अहमदनगर : भारतीय जनता पक्षाची ३३ जणांची दुसरी यादी सोमवारी सायंकाळी जाहीर झाली. या यादीमुळे बहुतांश प्रभागातील पॅनल पूर्ण झाले आहेत. दोन्ही याद्यांचे मिळून भाजपने आतापर्यंत ४८ उमेदवार जाहीर केले आहेत. आणखी २० उमेदवार भाजप मंगळवारी सकाळी जाहीर करण्याची शक्यता आहे.भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर,पालकमंत्री प्रा. राम शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष तथा खा. दिलीप गांधी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, अॅड. अभय आगरकर, सुनील रामदासी, किशोर बोरा यांच्या सहीने ही यादी सोमवारी सायंकाळी जाहीर झाली. राष्ट्रवादीचे नगरसेवक कै. कैलास गिरवले यांच्या पत्नी निर्मला कैलास गिरवले यांना भाजपने प्रभाग क्रमांक बारामधून मैदानात उतरविले आहे. कुस्तीपटू अंजली वल्लाकट्टी-देवकर याही मैदानात उतरल्या आहेत. त्यांनाही भाजपने उमेदवारी जाहीर करून क्रीडापटूलाही महापालिकेत जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
पैसै घेवून उमेदवारी-राजेंद्र काळे
भाजपने पैसे घेवून उमेदवार दिले आहेत. ज्यांचे कोणतेही सामाजिक काम नाही अशांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. सुशिक्षित उमेदवारांना संधी दिली जाते, मात्र भाजपने आम्हाला डावलले आहे. भाजपने उमेदवारी दिली नसली तरी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे असे सी.ए. राजेंद्र काळे यांनी ‘लोकमत’ला प्र्रतिक्रया दिली. काळे यांच्या पत्नी मनीषा काळे- बारस्कर या भाजपच्या विद्यमान नगरसेविका असून त्या पक्षाने तिकिट न दिलेल्या एकमेव नगरसेविका आहेत.
असे आहेत ३३ उमेदवार
प्रभाग १- विद्या दगडे, संदीप कुलकर्णी, प्रभाग २- शीतल गुडा-शेंडे, प्रभाग ३- सय्यद जुबेर बाबामियॉ, सय्यद अब्दुल्ला शाकीर हशम, प्रभाग ४- वंदना शिवाजी शेलार, स्वप्निल शिंदे,प्रभाग ६-डॉ. आरती किरण बुगे, वंदना विलास ताठे, रवींद्र बारस्कर, प्रभाग ७- मोहन कातोरे, कमल कोलते, प्रभाग ८-सुवर्णा विजय बोरुडे, महेश सब्बन, प्रभाग ९- अनुराधा अजय साळवे (आरपीआय), अंजली जितेंद्र वल्लाकट्टी-देवकर, प्रदीप परदेशी, प्रभाग १०-शेख इशरत फैय्याज जहागीरदार, सुनील तमन्ना भिंगारे, नरेश चव्हाण, प्रभाग ११- गयाज शब्बीर कुरेशी, प्रभाग १२-सुरेश नारायण खरपुडे, निर्मला कैलास गिरवले, प्रभाग १३-गायत्री नरेंद्र कुलकर्णी, सोनाली अजय चितळे, मयूर बोचुघोळ, प्रभाग १४- अॅड. राहुल रासकर, संगीता दीपक गांधी, सुनील ठोकळ, प्रभाग १५-गीतांजली काळे, दत्ता गाडळकर, सुरेखा विशाल खैरे, चंद्रकांत पाटोळे.